Sharad Pawar-Bhagirath Bhalke-Anil Sawant Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur Constituency : शरद पवार सोडवणार पंढरपूरचा तिढा; बारामतीत भालके-सावंतांना बोलावले भेटीसाठी!

Assembly Election 2024 : पंढरपूरमधील बेबनावचा फटका महाविकास आघाडीला बसू नये, यासाठी आघाडीच्या नेत्यांकडून मनधरणीच्या हालचाली सुरू आहेत. पवारांच्या भेटीनंतर कोणता उमेदवार माघार घेणार की दोन्ही उमेदवार रिंगणात कायम राहणार, याची उत्सुकता आहे.

हुकूम मुलाणी

Mangalvedha, 03 November : पंढरपूर मतदारसंघातील महाविकास आघाडीतील तिढा सोडविण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. पवारांनी भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांना भेटीसाठी बारामतीमध्ये बोलविल्याची माहिती आहे. या भेटीत उमेदवारीचा तिढा सुटणार का याकडे पंढरपूर मतदारसंघाचे डोळे लागले आहेत.

पंढरपूर मतदारसंघात (Pandharpur Constituency) महाविकास आघाडीकडून दोघेजण मैदानात उतरले आहेत. काँग्रेसकडून भगीरथ भालके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत यांना एबी फार्म देण्यात आलेला आहे. तसेच, महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना पुन्हा तिकिट देण्यात आलेले आहे.

पंढरपूरमधील बेबनावचा फटका महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) बसू नये, यासाठी आघाडीच्या नेत्यांकडून मनधरणीच्या हालचाली सुरू आहेत. पवारांच्या भेटीनंतर कोणता उमेदवार माघार घेणार की दोन्ही उमेदवार रिंगणात कायम राहणार, याची उत्सुकता आहे.

भगीरथ भालके यांनी लोकसभा निवडणुकीत सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे, तर माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला होता, त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीची उमेदवार मिळावी, अशी मागणी केली होती. शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांनी दोन ते तीन वेळा निवडणुकीच्या अगोदर भेट घेतली होती. मात्र, भालके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झालेली नव्हती.

काँग्रेसच्या यादीत मात्र पंढरपूरमधून भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पंढरपूरसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती, त्यामुळे पंढरपूरवरील हक्क कायम राहावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल सावंत यांना एबी फार्म दिला आहे.

महाविकास आघाडीतील भगीरथ भालके की अनिल सावंत माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. शरद पवार यांच्या भेटीत काय रणनीती ठरते, हेही पाहावे लागणार आहे, त्यामुळे पंढरपूरकरांचे डोळे बारामतीकडे लागले आहेत.

अनिल सावंत आणि भगीरथ भालके या दोघांचेही अर्ज राहिल्यास महायुतीला त्याचा फायदा होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला सावंत यांचा अर्ज राहिल्यास राष्ट्रवादीचे मोहोळ आणि माढ्याचे उमेदवारांना अडचण होऊ शकते. ही शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादीच्या एका नेत्याने माजी आमदार प्रशांत परिचारक यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत मदतीची मागणी केली होती. मात्र, भाजपच्या विरोधात आपण कोणतीही भूमिका घेणार नाही, असे त्यांनी सांगितल्याची माहिती आहे.

पंढरपूरच्या राजकारणात महत्वपूर्ण ठरणारा विठ्ठल परिवाराची मदत घेण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू आहेत. विठ्ठल परिवाराची ताकद पंढरपूर, माढा, सांगोला आणि मोहोळ मतदारसंघात आहे, त्यामुळे विठ्ठल परिवार विरोधात जाणार नाही, याची दक्षता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुरू आहे.

बारामती शरद पवार यांच्या बैठकीतून काय निर्णय होतो, याकडे मतदारसंघाचे लक्ष असणार आहे. दरम्यान, विठ्ठल परिवारानेही उद्या (सोमवार, ता. ०४ नोव्हेंबर) दुपारी चार वाजता बैठक बोलावली आहे. त्यामुळे बारामतीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT