Yavatmal, 03 November : महाराष्ट्रातील एका मातब्बर राजकीय कुटुंबातील फूट अखेर टळली असून छोट्या भावासाठी मोठ्या भावाने माघार घेतली आहे, त्यामुळे महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देणारे पुसदचे नाईक कुटुंबीय अखेर एकसंघ राहण्यास मदत झाली आहे. पुसद मतदारसंघातून ययाती नाईक यांनी माघार घेत त्यांचे मोठे बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक यांना पाठिंबा जाहीर केला आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या (Pusad) नाईक घराण्याने महाराष्ट्राला प्रथम वसंतराव नाईक आणि त्यानंतर सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री दिले आहेत. त्यानंतर मनोहर नाईक यांनी नाईक घराण्याचा राजकीय वारसा पुढे चालवला आहे. मनोहर नाईक हे काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून मंत्री होते.
मनोहर नाईक यांचे दोन्ही पुत्र पुसद मतदारसंघातून एकमेकांच्या विरोधात उतरले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदार इंद्रनील नाईक (Indranil Naik) यांना उमेदवारी दिली होती. इंद्रनील नाईक यांचे मोठे बंधू ययाती नाईक हेही विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते, त्यामुळे ययाती नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, पवारांनी मतदारसंघातील सामाजिक समीकरण लक्षात घेऊन ययाती नाईक यांच्या ऐवजी पुसदमधून मराठा समाजाच्या उमेदवार रिंगणात उतरवला होता.
शरद पवार यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर ययाती नाईक (Yayati Naik) यांनी अपक्ष म्हणून पुसद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. ययाती नाईक यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे दोन भावांमध्ये टक्कर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती, त्यामुळे पुसद मतदारसंघात प्राबल्य असलेल्या बंजारा समाजाच्या मतांची विभागणी झाली असती. नाईक बंधूंमधील मतांची विभागणी ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडली असती.
दोन भावांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला असता, हे लक्षात घेऊन ययाती नाईक यांनी आपल्या भावाच्या विरोधात दाखल केलेला उमेदवारी अर्ज अखेर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे चिरंजीव अविनाश नाईक यांनी ययाती नाईक यांना मुंबईला बोलावून त्यांची समजूत काढण्यात यश मिळविले, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावशाली असलेल्या नाईक कुटुंबातील वाद अखेर मिटण्यास मदत झाली आहे.
ययाती नाईक यांनी छोटा भाऊ आमदार इंद्रनील नाईक यांच्यासाठी माघार घेतल्याने नाईक कुटुंबातील फूट टळली आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार इंद्रनील नाईक यांना निश्चितपणे होणार आहे. मात्र, ययाती नाईक यांनी कारंजा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मात्र कायम ठेवला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.