Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar News : कर्नाटकमध्ये एकजूट होऊ शकते; तर देशातील इतर राज्यांमध्येही... शरद पवारांनी वाढवले भाजपचे टेन्शन!

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar Sharad Pawar News : चित्र बदलत आहे. काल मी बंगळुरुमध्ये होतो. आज त्या ठिकाणी काँग्रेसचे राज्य आले आहे. त्या ठिकाणी अनेक वर्षे काही लोकांचे राज्य होते. राज्य हातात घेऊन माणसांमध्ये द्वेष वाढण्याचे काम त्या लोकांनी केले. सर्व देशाला वाटत होते की कर्नाटकची निवडणूक ही सत्ताधारी जिंकणार. पण काल नवीन शपथविधी झाला आणि सामान्यकर्त्यांचे राज्य त्या ठिकाणी आले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

हमाल माथाडी महामंडळाच्या २१ व्या राज्य अधिवेशन आज (ता.२१) अहमदनगर (Ahmednagar) येथे झाले. या अधिवेशनामध्ये शरद पवार (Sharad Pawar) बोलत होते. यावेळी शरद पवार म्हणाले, '' सिद्धरामय्यांच्या शपथविधीला एक लाखापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी हजर होते. त्यातील ७० टक्के हे तरुण होते तसेच सर्व जाती-धर्मातील होते. मुख्यमंत्री हा धनगर समाजाचा माणूस झाला. जो कष्टकरी आहे इतरांच्या हिताची जपणूक करतो.

समाजातील एक लहान वर्गाचा, जातीचा म्हणून त्यांनी काल मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हे कशावरुन घडले तर तेथील कष्टकरी लोकांची एकजूट, लहान माणसांची एकजूट. मग ती एकजूट कर्नाटकामध्ये (Karnataka) होऊ शकते तर देशातील अनेक राज्यांमध्ये कशी होत नाही हे बघण्याचा आता काळ आलेला आहे, असे पवार म्हणाले.

''आज या ठिकाणी हमाल माथाडी महामंडळाचे अधिवेशन भरले. अनेक कायदे आलेत. कारखानदारी वाढली, दरवर्षी ती वाढते. अनेक हातांना त्यामुळे काम मिळते. ते काम देत असताना जो काम करणारा आहे त्याला कायद्याने संरक्षण आहे. मात्र, या कायद्याच्या संरक्षणावर हल्ला करण्याचे काम काही लोकांनी सुरू केलेले आहे. माथाडी हमाल कायदा या देशामध्ये महाराष्ट्रात सुरू झाला आणि आज या कायद्याने कष्टकऱ्यांना सन्मानाने जगण्याची संधी दिली.''

''परंतु आज काही लोक असे आहेत की त्यांना माथाडी कायदा खुपतो आहे. आज मालक वर्गाची एक मानसिकता वेगळी झाली आहे. संपत्ती मिळवायची आणि ठेवायचा अधिकार फक्त आमचा आहे आणि कष्ट करणारी जमात ही तुमची आहे. कष्ट करण्याचे काम तुमचे आणि धनसंपत्ती ठेवयाचे काम मालकांचे. त्यामुळे एक शुद्र, अति शुद्र असे वातावरण समाजामध्ये करून आज काही लोक मालकांच्या नावाने एक वेगळा निकाल घेत आहेत.''

''तो निकाल त्यांना घेयचा असेल तर माथाडी कामगारांवर हल्ला करणे, त्यांना दुर्बल बनवणे ही भूमिका त्यांच्या मनामध्ये आहे. आज हा कायदा सुखासुखी झाला नाही. मला आठवते की, महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यावेळी मी नुकताच निवडून गेलो होतो. अण्णा पाटील, बाळासाहेब देसाई, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील असा अनेकांनी शक्ती पणाला लावली. मग गिरणी कामगार, माथाडी कामगार या सगळ्या लोकांची शक्ती तयार केली आणि त्यांच्यासाठी कायदा तयार करण्याचा निकाल घेतला. त्या कायद्याने तुमच्या जीवनात एक प्रकारची शाश्वती आली,'' असे पवार यांनी स्पष्ट केले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT