Abhijeet Patil -Sharad Pawar
Abhijeet Patil -Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar's Pandharpur Tour : अभिजित पाटील शरद पवारांना भेटले अन॒ पंढरपूरचा दौरा फिक्स करून आले

भारत नागणे

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ते प्रथमच ७ मे रोजी पंढरपूरला (Pandharpur) येणार आहेत. पंढरपूर जवळच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायोगॅस प्रकल्पाचे भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. (Sharad Pawar will visit Pandharpur on May 7)

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आज (ता. ५ मे) मुंबईत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यांना बायोगॅस प्रकल्पाचे भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. ते निमंत्रण शरद पवार यांनी स्वीकारले आहे, असे अभिजीत पाटील यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रथमच ते एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी पंढरपूरला येत आहेत. त्यांच्या या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने बायोगॅस प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते सात मे रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. या कार्यक्रमानंतर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शेतकरी मेळाव्यास शरद पवार उपस्थित राहून शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत.

शरद पवार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अतूट असे नाते आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत शरद पवार यांचा मोठा सहभाग आहे. त्यांनी अनेक वेळा कारखान्यास मदत ही केली आहे. अलीकडच्या काळात विठ्ठल सहकारी साखर कारखाना दोन वर्षे बंद होता. तो सुरू करण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनाही त्यांनी मार्गदर्शन आणि मदत केली आहे.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील सत्तानंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर शरद पवार यांच्या उपस्थित प्रथमच हा कार्यक्रम होत आहे. त्यामुळे या कार्यक्रमात ते काय बोलतात, याकडे पंढरपूरसह परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT