Sharad Pawar, Shivendraraje Bhosale, Makrand Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शशीकांत शिंदेंसाठी शरद पवारांचा शिवेंद्रसिंहराजे, मकरंद पाटलांना फोन...

रांजणेंचा Ranjane अर्ज राहण्यामागे राष्ट्रवादीच्याच Nationalist congress काही नेत्यांची फुस असल्याचे आता उघड होऊ लागले आहे.

उमेश बांबरे : सरकारनामा ब्युरो

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जावळी सोसायटी मतदारसंघात ज्ञानदेव रांजणेंच्या भूमिकेमुळे व राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमुळे चक्रव्युहात सापडलेल्या आमदार शशीकांत शिंदेंना यातून बाहेर काढण्यासाठी खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी लक्ष घातले. त्यांनी आमदार मकरंद पाटील व शिवेंद्रसिंहराजेंना मोबाईलवरून संपर्क करून शशीकांत शिंदेंना जिल्हा बँकेतील मार्ग सोपा करण्याची सूचना केली. त्यानुसार शिवेंद्रसिंहराजेंनी जावळीतील मतदारांची मनधरणी करत आमदार शिंदेंना मदत करण्याची सूचना केली. या मनधरणीतून काय निष्पन्न होणार हे मतमोजणी दिवशीच स्पष्ट होणार आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जावळी सोसायटी मतदारसंघात हाय होल्टेज ड्रामा सुरू आहे. आमदार शशीकांत शिंदे यांच्यासाठी राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी चक्रव्यूह टाकले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी शशीकांत शिंदे मतदानाच्या दिवसापर्यंत प्रयत्न करणार आहेत. जावळी सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे यांनी आमदार शिंदेंच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज भरण्यासाठी त्यांना राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांची फुस असल्याचे आता उघड होऊ लागले आहे.

मतदानाच्या आजच्या आदल्या दिवसापर्यंत अनेक घडामोडी या मतदारसंघात घडल्या आहेत. ज्ञानदेव रांजणे यांनी २८ मतदार टुरवर पाठवून आमदार शिंदेंपुढे अडचण निर्माण केली होती. मुळात जागा वाटपाच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकांच्या दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला जावळी सोसायटीतून निवडणूक लढण्यास सांगितल्याचे रांजणे यांनी सांगून गुगली टाकली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडे ३४ मते असल्याचे सांगितले होते.

पण, हॉटेल फर्नमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत रांजणे यांनी अर्ज मागे घेण्यास नकार देत शिंदेंपुढे आव्हान निर्माण केले होते. त्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील व शशीकांत शिंदें यांच्यात बैठक होऊन रांजणे यांचा अर्ज मागे घेण्याबाबत ठरले होते. त्यानंतर आमदार शिंदें आजारी पडल्याने या प्रक्रियेपासून थोडे लांब राहिले. याचा फायदा उठवत रांजणे यांनी जावळीतील २८ मतदार सुरक्षितस्थळी रवाना केले. शशीकांत शिंदे परत साताऱ्यात येईपर्यंत बरेचसे पाणी पुलाखालून गेले होते. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी रांजणे मतदारांसह 'नॉट रिचेबल' झाले होते.

त्यानंतर आमदार शिंदे जावळीत ठाण मांडले व मतदारांशी व त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करून त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली. अगदी तामीळनाडू, कर्नाटक, बालाजीपर्यंत त्यांनी या मतदारांचा पाठलाग केला. पण, त्यांच्या हाती थोडे मतदार लागले. आमदार शिंदेंनी जावळीतील उर्वरित मतदार सुरक्षित स्थळी नेले आहेत. त्यामुळे आमदार शिंदे व रांजणे यांच्याकडील मतदारांचा फरक दोन, चार मतांचा आहे. याची जुळणी करण्याचे काम शशीकांत शिंदे करत आहेत. आणखी दोन, तीन मते फोडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

जावळीच्या रणांगणात आमदार शशीकांत शिंदे हे अडचणीत असल्याची माहिती काही निष्टावंतांनी खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत पोहोचवली. त्यानुसार काल खासदार शरद पवार यांनी आमदार मकरंद पाटील व शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क करून शशीकांत शिंदेंचा जिल्हा बँकेत येण्याचा मार्ग सोपा करावा, अशी सूचना केली. यावेळी त्यांनी आमदार मकरंद पाटलांनाही कानपिचक्या दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आमदार शिवेंद्रसिंहराजेंशी मोबाईलवरून संपर्क करून आमदार शिंदेंना मदत करण्याची सूचना केली आहे.

शरद पवार व अजित पवार यांच्या सूचनेनुसार आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी जावळीतील मतदारांशी संपर्क करून गणपतीपुळे गाठले. त्यांनी तेथे मतदारांची मनधरणी करत शशीकांत शिंदेंना मदत करण्याचे आवाहन केले आहे. आता रांजणे यांनी नेलेले सर्व मतदार जावळी तालुक्यात आलेले आहेत. उद्या (रविवारी) जिल्हा बँकेसाठी मतदान होत आहे. मतदानावेळी जावळीत मतदारांसह आपल्या जीविताला धोका असल्याची तक्रार श्री. रांजणे यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. जावळी तालुक्यात हाय होलटेज ड्रामा सुरू असल्याने मतदानावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. एक मतदार एक पोलिस बंदोबस्तासाठी दिला जाणार आहे. त्यामुळे मतमोजणीनंतरच शिवेंद्रसिंहराजेंनी मतदारांची केलेली मनधरणी आमदार शिंदेंच्या सत्कारणी लागली का, हे स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT