Sashikant Chavan-Rohini Tadwalkar-Chetansinh kedar-Sawant  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur BJP : भाजपने सोलापुरात भाकरी फिरवली; कल्याणशेट्टींच्या जागी चव्हाण, तडवळकर शहराध्यक्ष, प्रथमच महिलेला संधी, केदार सावंत कायम

District & City President Election : सोलापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघासाठी पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे जबाबदारी होती. आता कल्याणशेट्टी यांच्या जागी मंगळवेढ्याचे शशिकांत चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 13 May : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर भाकरी भिरवली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या पूर्व भागाचे अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या जागी मंगळवेढ्यातील निष्ठावंत कार्यकर्ते शशिकांत चव्हाण यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्षपद चेतन केदार-सावंत यांच्याकडे कायम ठेवण्यात आले आहे, तर सोलापूर शहराध्यक्षपदी रोहिणी तडवळकर यांना संधी देण्यात आली आहे. भाजपने तीनही महत्वाची पदे निष्ठावंत कार्यकर्त्यांना दिली असून रोहिणी तडवळकर यांच्या माध्यमातून भाजपने सोलापूर शहराध्यक्षदी प्रथमच महिलेला संधी दिली आहे.

भारतीय जनता पक्षाने (BJP) संघटनात्मक बांधणीस सुरुवात केली होती. सुरुवातीला बूथपातळीपासून सुरू झालेली संघटना बांधणी आज जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीपर्यंत पोचली आहे. भाजपकडून राज्यात 58 जिल्हाध्यक्षांच्या निवडीची घोषणा केली आहे. जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीवर लक्ष टाकल्यास बाहेर आलेल्या नेत्याऐवजी पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिल्याचे दिसून येत आहे.

सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या पूर्व आणि पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्षपदाचाही आज निवडीत समावेश आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघासाठी पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून पूर्वी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे जबाबदारी होती. आता कल्याणशेट्टी यांच्या जागी मंगळवेढ्याचे शशिकांत चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे.

शशिकांत चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते महणून ओळखले जातात. भाजपच्या कोणत्याही गटातटात न आडकता ते आतापर्यंत काम करत आले आहेत. चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष म्हणून झाली. त्यानंतर ते एक एक पायरी चढत जिल्हाध्यक्षपदापर्यंत पोचले आहेत.

भाजप युवा मोर्चाचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष म्हणून काम केलेले चव्हाण यांनी त्यानंतर मंगळवेढा भाजप शहराध्यक्ष, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष, पक्षाचे संघटन चिटणीस, त्यानंतर सरचिटणीस अशा चढत्या पदावर शशिकांत चव्हाण यांनी काम केले आहे आणि पक्षाने आता चव्हाण यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ घातली आहे.

पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्षपद चेतन केदार सावंत यांच्याकडे कायम ठेवण्यात आले आहे. माढा लोकसभा मतदारसंघात अपशय येऊनही केदार सावंत यांनी आपले पद टिकविण्यात यश मिळविले आहे. त्यांच्या पाठीशी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेही भक्कम पाळबळ आहे.

सोलापूर शहराध्यक्षपदाची धुरा नरेंद्र काळे यांच्याकडून काढून ती रोहिणी तडवळकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. भाजप आणि संघाशी एकनिष्ठ म्हणून तडवळकर कुटुंबीयांची ओळख आहे. रोहिणी तडवळकर यांनी राष्ट्रसेविका आणि विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली होती. त्या १९९२ मध्ये प्रथम सोलापूर महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. तडवळकर या २००२ ते २००७, २०१२ ते २०१७ या कालावधीतही त्या नगरसेविका होत्या. तसेच, विरोधी पक्षनेत्याही म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला.

नगरसेवक, विरोधी पक्षनेते म्हणून कामाचा ठसा उमटविणाऱ्या रोहिणी तडवळकर यांनी पक्षसंघटनेत तेवढ्याच ताकदीने काम केले आहे. भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्या भाजपच्या सोलापूर शहराच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT