Shashikant Shinde, Mahesh Shinde
Shashikant Shinde, Mahesh Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नवी नवरी लाथा मारत असेल तर, जागा दाखवू : शशिकांत शिंदेंचा महेश शिंदेंना इशारा

अतुल वाघ

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यात सध्या वेगळाच कार्यक्रम सुरू आहे. काही लोक दुसऱ्याने केलेल्या कामांचे श्रेय घेऊ लागलेले आहेत. स्पर्धा झाली पाहिजे. परंतु, ती विकासकामांची व्हायला हवी. पोस्टरबाजीची नको. जे आम्ही केले त्याचे श्रेय आम्हीच घेणार. आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळतो. पण, दोन वर्षांपूर्वी नवीन आलेल्या नवरीची नवलाई राहावी म्हणून आम्ही दोन वर्षे काही बोललो नाही. परंतु, आता ही नवरी आम्हाला बाहेर काढून लाथा मारत असेल तर तिला जागा दाखवावी लागेल, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांचा नामोल्लेख टाळून दिला.

बिचुकले (ता. कोरेगाव) येथे विविध विकास सेवा सोसायटीच्या इमारतीचे उद्‌घाटन खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी आमदार शिंदे बोलत होते. कार्यक्रमास सारंग पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषद सदस्य डॉ. अभय तावरे, पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे, शकिला पटेल, अजय कदम, नाना भिलारे, शिवाजी महाडिक, राजेंद्र भोसले, चंद्रकांत नलवडे, नितीन लवंगरे, सरपंच प्रशांत पवार उपस्थित होते.

या भागातील खटाव तालुक्याला जोडणारा बोधेवाडी घाट फोडून इथून रस्ता व्हावा, अशी भावना कोरेगावचे माजी आमदार शंकरराव जगताप यांनी माझ्याजवळ बोलून दाखवली होती, असे सांगून आमदार शशीकांत शिंदे म्हणाले, कोणतेही विकासकाम हे एका प्रयत्नात होत नाही. त्यासाठी त्या कामात सातत्य ठेवावे लागते. त्यामुळे बोधेवाडी खिंड पूर्ण होण्यासाठी अनेक वर्षे गेली. देऊर-बिचुकले रस्ता हा आम्ही केला. मात्र, त्याचे उद्‌घाटन त्यांनी केले.

बिचुकले परिसर दुष्काळी आहे. पण, गावातील लोकांनी जलयुक्त चळवळीतून यावर यशस्वीपणे मार्ग काढला आणि डोंगरात पाणी पोचले. हे गाव भविष्यात कृषी व्यवसायात नावारूपाला यावे यासाठी या गावाला कृषी बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाहीही आमदार शिंदे यांनी दिली. कोरेगाव तालुक्यातील बिचुकले परिसर दुष्काळी पट्ट्यातील आहे. या भागातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे, यासाठी लवकरच एकत्रितपणे निर्णय घेऊ, अशी ग्वाही खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT