Satara, 20 July : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जावळीत मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. ठरावापूर्वीच संचालकांच्या पळवापळवीला सुरुवात झाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा धुमश्चक्री पहायला मिळणार आहे. शशिकांत शिंदे मागील निवडणुकीत एका मताने झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी फुल नियोजनाने मैदानात उतरले आहेत. मंत्री भोसले गटाची ताकद कागदावर जरी दिसत असली तरी त्यांच्यातील बेबनाव शिंदेंच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या सोसायटी मतदारसंघातून जावळीतून प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे इच्छुक असून मंत्री शिवेंद्रसिंह गटाचा उमेदवार अद्याप ठरला नसला तरी विद्यमान संचालक ज्ञानदेव रांजणे हे प्रमुख दावेदार मानले जातात.
गत पंचवार्षिक निवडणुकीत नवख्या ज्ञानदेव रांजणे यांनी शशिकांत शिंदेंना केवळ एका मताने पराभूत करत जिल्हा बँकेत प्रवेश मिळवला होता. ‘जायंट किलर’ ठरलेल्या ज्ञानदेव रांजणे यांच्या पाठीमागे त्यावेळी शिवेंद्रसिंहराजेंनी आपली संपूर्ण ताकद उभी केली होती. त्याशिवाय पडद्यामागे राहून अनेक अदृश्य हातांनी रांजणे यांना मदत केली होती.
मागील पराभवातील गाफिलपणा टाळून प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी ताकदीने मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. मंत्री शिवेंद्रसिंह प्रत्यक्षात ॲक्शन मोडवर नसले तरी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जावळीत मतदानास पात्र एकूण ४९ सोसायट्या असून नुकतेच शिवेंद्रसिंह यांनी घेतलेल्या सोसायटी संचालक बैठकीत चाळीसहून अधिक सोसायट्याचे प्रतिनिधी उपस्थित होते, त्यामुळे कागदावर शिवेंद्रसिंह गटाची बाजू भक्कम वाटत असली तरी ठरावावरुन संचालकांमध्ये असलेल्या बेबनावाचा फायदा शशिकांत शिंदे उचलणार, हे स्पष्ट आहे.
आजअखेर एकूण आठ सोसायट्यांचे ठराव पूर्ण झाले असून या आठवड्यात उरलेल्या ठरावाची प्रक्रिया पूर्ण होईल. यामध्ये विद्यमान संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या केळघर सोसायटीसह बाजार समिती सभापती जयदीप शिंदे यांच्या सोनगाव सोसायटीचा समावेश असून हे आठही ठराव शिवेंद्रसिंह गटाचे मानले जातात.
शशिकांत शिंदेंच्या हुमगांवसह आखाडे, वालुथ, खर्शी बारामुरे, इंदवली, मार्ली, दरे खुर्द व दरे बुद्रुक, मोरघर तसेच मेढा व केळघर परिसरातील चार सोसायट्यांचे ठराव हे शशिकांत शिंदेंना मिळून हा आकडा २५ च्या पुढे जाईल, असा शिंदे समर्थकांचा दावा आहे.
दुसरीकडे जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे व उपसभापती गोरख महाडिक यांच्या ताब्यातील सोसायट्यांच्या ठरावावरुन अद्याप संभ्रम आहे.
करहर येथे नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत मंत्री शिवेंद्रसिंह यांनी अद्याप जिल्हा बँकेचा उमेदवार फायनल झाला नसल्याची गुगली टाकली आहे, त्यामुळे कोणाला संधी मिळते, याकडे इच्छुकांचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.