Saurabh Shinde, Tejas Shinde
Saurabh Shinde, Tejas Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पुतण्याच्या भूमिकेने शिंदेंना दुःख; आमची निष्ठा पवार साहेब, राष्ट्रवादीशी कायम....

Umesh Bambare-Patil

सातारा : राज्याचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला नवी मुंबई येथील काही नगरसेवक काल गेले होते. त्यांच्यासोबत आमचे चुलत बंधू (शशिकांत शिंदे यांचे पुतणे) सौरभ शिंदे हेही होते. त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिल्याचे ऐकून शशीकांत शिंदे साहेबांना मानसिक दुःख झाले आहे. कोणत्याही परिणामाचा विचार न करता सौरभने परस्पर चुकीचा निर्णय घेतला आहे. पण, कोणी काहीही निर्णय घेऊ देत. आमची निष्ठा पवार साहेब व राष्ट्रवादीशी कायम राहिल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

पुतण्या सौरभ शिंदेंच्या भूमिकेमुळे आमदार शशीकांत शिंदे यांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागणार आहे, असे सांगून तेजस शिंदे म्हणाले, आमच्या कुटुंबाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, शिंदे साहेबांचे वडील माथाडी कामगार असताना आमच्या कुटुंबांची व आमदार शशिकांत शिंदे यांची ओळख ही फक्त शरद पवार यांच्या मुळे झाली आहे.

माथाडी संघटनेचे काम करताना शरद पवार यांनी आमदारकीचे थेट तिकीट देऊन शिंदे साहेबांना महाराष्ट्राच्या राजकारणात संधी दिली. त्यानंतर शिंदे साहेबांनी मेहनत करून, यशस्वी होऊन शरद पवार यांचा आणि राष्ट्रवादी पक्षाचा विश्वास सार्थ ठरवला. त्यांनी राज्यात मंत्रीपद भूषवले, सातारा जिल्ह्यात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले.

या सर्व राजकीय वाटचालीत आमच्या सर्व कुटुंबाची, चुलतेसहित त्यांच्या सर्व कुटुंबाची ओळख ही पवार साहेबांच्या आशिर्वादामुळे झाली आहे. मध्यंतरी आमच्यावर अनेक आघात झाले. तरीही शिंदे साहेबांनी शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरील निष्ठा कधीही ढळू दिली नाही. ही बाब एका बाजूला असताना कुटुंबातील एका व्यक्तीचे विरोधी गटाला पाठींबा देण्याबाबत घेतलेला निर्णय शिंदे साहेबांच्या निष्ठेवर आणि त्यांच्या पक्ष निष्ठेला तडा जाणारी आहे.

याचा विचार त्यांनी भूमिका घेताना करायला हवा होता. नवी मुंबई शहराची जबाबदारी खासदार शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षप्रमुख यांनी शशीकांत शिंदे यांच्यावर सोपवली. ही जबाबदारी शिंदे साहेब प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक चांगली लढत देण्याचा प्रयत्न ते करत आहेत.

या प्रयत्नांना अडथळा म्हणूनचं या प्रयत्नांच्या मूळावर घाव घालण्याचा हा प्रयत्न झाला आहे. त्यासाठी कळत न कळत कुटुंबातीलच व्यक्तीचा उपयोग केला गेला, हे दुर्दैवी आहे. कुटुंबातील कोणाशी चर्चा न करता थेट प्रतिक्रिया दिली गेली. अशा प्रकारचा चुकीची भूमिका घेताना सौरभ शिंदे यांनी त्याचे राजकीय परिणाम काय होतील याचा विचार करणे आवश्यक होते.

या प्रकारातून विरोधक सातारा जिल्ह्यात व नवी मुंबई मध्ये शशीकांत शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. काही झाले तरी पवार साहेबांचा हा निष्ठावंत शिलेदार कडवी झुंज देऊ शकतो. या सर्व घटना घडल्यानंतर कोणी काय निर्णय घ्यायचा तो घेवो. पण आम्ही शरद पवार साहेब व राष्ट्रवादी पक्षावरील निष्ठा ढळू देणार नाही. आमची निष्ठा शरद पवार साहेबांशी व राष्ट्रवादीशी कायम राहील. या संदर्भामध्ये कुठेही संघर्ष करावा लागला तरी निष्ठेमध्ये तडजोड नाही, असे स्पष्ट मत तेजस शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT