Solapur, 01 June : सांगली-सातारा विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी इच्छूक असलेले शेखर गोरे यांना भारतीय जनता पक्षाकडून डावलण्यात आले आहे. या मतदारसंघातून भाजपने माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली आहे, त्यानंतर गोरे समर्थकांनी तीव्र संताप व्यक्त केला. खुद्द शेखर गोरे यांनी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘साहेब, मी नक्की कुठे चुकलो’ असा सवाल केला आहे. तसेच, माझ्या कार्यकर्त्यास त्रास दिला तर ‘मी शांत आहे; पण संत नाही’ मी हिशेब चुकता करेन,’ असा इशाराही दिला आहे.
विधान परिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी भाजपकडून माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, शेखर गोरे, सुनील काटकर हे साताऱ्यातून, तर सांगलीतून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सम्राट महाडिक हे इच्छूक होते. या मतदारसंघात भाजपचे सर्वाधिक, तर महायुतीकडे स्पष्ट बहुमताचा आकडा असल्याने इच्छुकांची मोठी संख्या भाजपकडे होती.
शेखर गोरे यांनी विधानसभा निवडणुकीत केलेल्या मदतीची आठवण करून देत उमेदवारी मागणी केली होती. मात्र, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी धैर्यशील कदम यांच्यासाठी ताकद लावली होती आणि त्यांनाच विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे गोरे यांना थांबण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
उमेदवारी डावलल्यानंतर शेखर गोरे यांनी मोबाईल स्टेट्स ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केले आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की, साहेब, मी नक्की कुठे चुकलो. आपल्या सांगण्यावरून गेल्या १३ वर्षांचा संघर्ष संपवून तुम्ही दिलेल्या जाहीर आश्वासनावर विश्वास ठेवून, तुमच्या भाजपच्या विधानसभेच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देऊन प्रचंड बहुमतांनी निवडून आणले.
माण-खटावमधून सर्वच निवडणुकीत माझ्या कार्यकर्त्यांना संधी न देता आपल्या उमेदवारांना ताकदीने निवडून आणण्याचे काम केले आहे. याचे साक्षीदार माझ्या माण खटावची जनता आहे. आपण शब्द पाळणारा नेता आहात, हे ऐकून होतो. पण आज प्रत्यक्षात अनुभवले. आपला शेखर गोरे, असे त्यांनी म्हटले आहे.
दुसऱ्या एका स्टेट्समध्ये कार्यकर्त्यांना त्रास दिला आपण शांत बसणार नाही, असे शेखर गोरे यांनी म्हटले आहे. मी शांत आहे, पण मी संत नाही. माझे सोडा, माझे सहकारी ग्रुपवर बोलताना चुकत असतील. पण त्यांना कोणी त्रास दिला तर हा शेखर गोरे गप्प बसणार नाही. मग तो कोणीपण असू दे. राजकारण राहील बाजूला; पण हिशेब चुकता करेन, असा इशाराही शेखर गोरे यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.