Eknath Shinde & Uddhav Thakre
Eknath Shinde & Uddhav Thakre Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शिंदे गटाने नगर जिल्ह्यातील शिलेदारांची नावे केली जाहीर : राजकीय गोंधळाची शक्यता

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - राज्यात शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी शिवसैनिकांना प्रतीक्षापत्र लिहून देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांकडून उद्धव ठाकरे यांना काल ( ता. 22 ) शिवसैनिकांची प्रतीक्षापत्रे सादर केली. या घटनेला 24 तास उलटत नाहीत तोच एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) गटाने नगर जिल्ह्यातील आपल्या शिलेदारांची नावे जाहीर केली. हे शिलेदार उद्या नगर शहरात येणार आहेत. त्यामुळे नगर शहरात राजकीय गोंधळ होण्याची शक्यता आहे.

राज्यातील खरी शिवसेना कोणती व बंडखोर 16 आमदारांवर कारवाई होणार का या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी आज होती. मात्र हे प्रकरण पाच न्यायाधिशांच्या समोर ठेवण्याचा निर्णय झाला. विशेष म्हणजे शिंदे गटाची ही कार्यकारिणी 12 ऑगस्टलाच तयार करण्यात आली होती. तसे पत्रही तयार करण्यात आले होतो. मात्र ही कार्यकारिणी आज दुपारी जाहीर करण्यात आली.

शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार अनिल राठोड यांच्या निधनानंतर अहमदनगर शहरात शिवसेनेचे दोन गट उघडपणे समोर आले होते. मात्र अहमदनगर महापालिकेतील महापौर व उपमहापौर निवडणुकीनंतर या दोन गटात कटुता निर्माण होऊ लागली होती. यातील एका गटाने शिवसेनेचे तत्कालीन संपर्कप्रमुखांबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली होती. एका नगरसेविकेच्या नातेवाईकाने तत्कालीन संपर्कप्रमुखांना धक्काबुक्की केली होती.

राज्यातील शिवसेनेत दोन गट पडल्यावर मात्र नगरसेवक अनिल शिंदे, सुभाष लोंढे, दिलीप सातपुते आदी एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आले. अनिल शिंदे यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच पेढे वाटत आनंदोत्सव केला होता. या नेत्यांना आता शिंदे गटाने जिल्हा कार्यकारिणीत स्थान दिले.

शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख पदी अनिल शिंदे, शहर प्रमुख पदी दिलीप सातपुते, भिंगारशहर प्रमुख पदी सुनील लालबेंद्रे, उपजिल्हाप्रमुख पदी सुभाष लोंढे आणि जिल्हा संपर्कप्रमुख पदी सचिन जाधव यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र शिवसेना सचिव संजय मोरे यांनी दिले आहे. हे शिंदे गटाचे नुतन पदाधिकारी उद्या ( ता. 24 ) अहमदनगर शहरात येणार आहेत. त्यामुळे शहरात राजकीय गोंधळ होण्याची शक्यता आहे. हा राजकीय गोंधळ नवीन राजकीय वादाला जन्म तर देणार नाही ना यावर सध्या शहरात उलट सुलट चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT