Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कारखान्याचे विद्यमान चेअरमन गणपतराव पाटील यांच्या, श्री दत्त शेतकरी विकास पॅनलने एकतर्फी सत्ता मिळवली. विरोधी आंदोलन अंकुशच्या नेतृत्वाखालील दत्त साखर कारखाना बचाव पॅनेलच्या सातही उमेदवारांचा दारुण पराभव झाला.
दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी निवडणुकीतील सर्वाधिक मते मिळवलेल्या 18 उमेदवारांची नावे जाहीर केली. यापूर्वी तीन उमेदवारी बिनविरोध झाले आहेत. याबाबत केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाल्यानंतर विजयी उमेदवारांची नावे घोषित करणार असल्याचे सांगितले.
श्री दत्त शेतकरी सहकारी कारखाना सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले होते. सर्वसाधारण उत्पादक सभासद गटातील 16 जागा व सर्वसाधारण उत्पादक महिला गटातील दोन जागा अशा 18 जागा करता मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी गणपतराव पाटील (Ganpatrao Patil) यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या विरोधात आंदोलन अंकुशचे सात उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.
शुक्रवारी सकाळी आठ वाजता 67 टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांमध्ये सर्वसाधारण उत्पादक गटातील व सर्वसाधारण महिला गटातील मतपत्रिकाचे वर्गीकरण करण्यात आले. यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर सत्ताधारी गटाचे सर्व 18 उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होणार हे स्पष्ट झाले होते. दुपारी एकपर्यंत मतमोजणी झाली. यामध्ये सत्ताधारी गटाचे सर्व उमेदवार अकरा हजारपेक्षा अधिक मताधिक्याने पुढे असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल एडगे (Amol Eadge) हे जिल्ह्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या ठिकाणी अधिक काळ थांबले नाहीत. यामुळे ऑनलाइनद्वारे जिल्हाधिकारी यांनी सर्वाधिक मते मिळवलेल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा दुपारी तीन वाजता केली.
सर्वाधिक मते मिळवलेल्या उमेदवारांची तसेच बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावे मल्टीस्टेट कायद्यानुसार केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठवण्यात येणार असून त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर सर्वाधिक मते मिळवलेल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी ऑनलाइन प्रक्रियाद्वारे दिली.
सत्ताधारी गटाचे उमेदवार व त्यांना मिळालेले मते अशी : अनिलकुमार यादव (१३२८६), अमर यादव (१३२२३), अरुणकुमार देसाई (१३१८१), बाबासाहेब पाटील (१३१६५) बसगोंडा पाटील (१२९५७), दरगु माने गावडे (१२९४०), गणपतराव पाटील (१३१०७), ज्योतीकुमार पाटील (१२६९७), निजामसो पाटील (१२६५६), प्रमोद पाटील (१२९८३), रघुनाथ पाटील (१२८९०) शरदचंद्र फाटक (१२७८८) शेखर पाटील (१२७४०), सिद्धगोंडा पाटील (१२५३५), विनया घोरपडे (१२६५६), विश्वनाथ माने (१२२२३), अस्मिता पाटील (१४७८३), संगीता पाटील (१४२०७).
विरोधी श्री दत्त शेतकरी साखर कारखाना बचाव पॅनेलच्या उमेदवारांना मिळालेली मते : संजय चौगुले (१८४१), दरगु चुडमुंगे (१७०१), ज्ञानू जगदाळे (१५८८), भीमराव माने (१४३२), दीपक पाटील (१४८३), सोमनाथ तेली (१२७३), अलका माने (१४१९).
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.