Local body elections Maharashtra, political rivalry : शिरोळ तालुक्यातील शिरोळ नगरपरिषद व जयसिंगपूर नगरपालिकेसाठी दोन आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने हे स्नुषा आणि शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे बंधूसाठी थेट मैदानात असणार आहेत. तर कुरुंदवाड नगर परिषदेमध्ये काँग्रेस स्वाभिमानीच्या गडाला हादरा देण्यासाठी शिवसेनेने फिल्डिंग लावली आहे. तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात महायुतीची ताकद असल्याने नगरपालिका आणि नगर परिषदेसाठी महायुतीपुढे उमेदवारी कोणाला द्यावी, यासाठी कसरत करावी लागणार आहे.
शिरोळ नगरपरिषदेचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलेसाठी जाहीर झाल्यामुळे सर्वसाधारण गटातील दिग्गजांचा हिरमोड झाला. शिरोळ नगरपरिषदेची स्थापना झाल्यानंतर दुसरा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून अनुसूचित जातीची महिला नगराध्यक्षा होणार आहेत. या पदासाठी राजर्षी शाहू आघाडी व यादव आघाडीकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने नेतेमंडळींना उमेदवारी निश्चित करताना कसरत करावी लागणार आहे.
शिरोळमध्ये पाटील व यादव असे दोन प्रबळ गट असले, तरी हातकलंगलेचे आमदार अशोकराव माने यांचे चिरंजीव माजी नगरसेवक डॉ. अरविंद माने यांच्या पत्नी सारिका या पदासाठी दावेदार आहेत. याशिवाय शिवानी सूरज कांबळे या राजर्षी शाहू आघाडीकडून इच्छुक आहेत. योगिता कांबळे, सुवर्णा कांबळे, करुणा कांबळे यांनीही यादव आघाडीकडून हालचाली सुरू आहेत.
जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी खुल्या गटातील आरक्षणामुळे जोरदार चुरस अपेक्षित आहे. तीन वर्षांपासून पालिकेवर 'प्रशासक राज' असल्याने इच्छुक उमेदवारांनी तयारी करून ठेवली आहे. नगराध्यक्षपदाच्या आरक्षणानंतर लढतीचे चित्र काहीसे स्पष्ट झाले असले तरी बुधवारी होणाऱ्या प्रभाग आरक्षण निश्चितीकडे लक्ष लागून राहिले आहे. खुल्या गटातील आरक्षणामुळे माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांचे नाव चर्चेत आले आहे.
दुसरीकडे जयसिंगपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात लौकिक असणारे स्व. डॉ. एस. के. पाटील यांचे सुपुत्र डॉ. श्रीवर्धन पाटील यांचेही नाव चर्चेत आले आहे. त्यांची उमेदवारी पुढे आल्यास निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे. डॉ. विजय मगदूम यांनी उपनगराध्यक्षपद भूषविले आहे, तर त्यांच्या पत्नी डॉ. ॲड. सोनाली यांनीही नगरसेविका म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे डॉ. सोनाली या नगरसेवकपदासाठी प्रभागाचे चाचणी करत आहेत. खुल्या गटातील आरक्षणामुळे पालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, इच्छुकांनी शड्डू ठोकून मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.
कुरुंदवाड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्यानंतर खुल्या वर्गातील इच्छुकांची निराशा झाली. मात्र त्यावर हार न मानता आता सौभाग्यवती यांनाच मैदानात उतरवण्याची तयारी ठेवली आहे. काँग्रेसप्रणित आघाडी, सर्वपक्षीय कृती समिती कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करीत आनंद साजरा केला. नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या स्नुषा योगिनी, रामचंद्र डांगे यांच्या स्नुषा मनीषा, रावसाहेब पाटील यांच्या स्नुषा पद्माराणी पाटील तसेच माजी नगराध्यक्ष त्रिशला जवाहर पाटील ही नावे चर्चेत आहेत.
यंदा तिरंगी लढतीचीच शक्यता आहे. पुन्हा प्रस्थापित घराणीच रिंगणात असणार हे निश्चित आहे. काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीकडून योगिनी पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. तसे झाल्यास योगिनी पाटील या जयराम पाटील यांच्या घराण्यातील पालिका निवडणुकीतील पहिल्या महिला ठरणार आहेत. राजर्षी शाहू आघाडीतर्फे (आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर गट) रामचंद्र डांगे यांच्या स्नुषा मनीषा डांगे आणि त्रिशाला पाटील या प्रबळ दावेदार मानल्या जातात. रावसाहेब पाटील गटातर्फे त्यांच्या स्नुषा पद्माराणी प्रमुख दावेदार आहेत. पद्माराणी पाटील यापूर्वी कधीच निवडणूक लढल्या नाहीत. मात्र, त्यांचे पती अभिजित यापूर्वी नगरसेवक होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.