Miraj Shivsena Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Miraj Shivsena : शिवसेना कार्यालय जागेच्या मालकी हक्कावरून मिरजेत दोन्ही गटांचे शिवसैनिक भिडले!

Shinde Vs Thackeray : शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि ठाकरे गटाच्या तालुकाप्रमुखांनी सांगितला दावा, महापालिकेची अडचण!

Mayur Ratnaparkhe

Miraj News : सांगलीच्या मिरजेत ठाकरे आणि शिंदे गटाचे शिवसैनिक एकमेकांना भिडले आहेत. शिवसेना कार्यालयाच्या जागेवर दोन्ही गटांकडून दावा करण्यात आला आहे, यातून दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला आहे.

शहरातील किल्ला भाग जुना या ठिकाणी असणारी जागा 1989 मध्ये पटवर्धन सरकार यांनी मिरज शहर शिवसेनेला भाडेतत्त्वावर दिली होती. उताऱ्यावर शिवसेना शहरप्रमुख म्हणून नोंद आहे, या उताऱ्याच्या आधारे उद्धव ठाकरे शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी जागेवर हक्क बजावत पत्र्याचे शेड उभे करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे(Uddhav Thackeray) जनसंपर्क कार्यालय उघडण्याचे काम सुरू केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहरप्रमुख किरण रजपूत यांनी या जागेवर हक्क बजावत, पत्र्याचे शेड काढण्यासाठी महापालिका प्रशासनाला तक्रार दिली होती, त्यानुसार अतिक्रमणविरोधी पथकाकडून या जागेच्या ठिकाणी धाव घेण्यात आली.

यावेळी उद्धव ठाकरे गटाचे शहरप्रमुख चंद्रकांत मैंगुरे आणि किरण रजपूत यांच्यामध्ये धक्काबुक्की आणि एकामेकांच्या अंगावर धाऊन जाण्याचा प्रकार घडला. दोन्ही गटाने जागेवर हक्क सांगितल्याने महापालिका प्रशासनाची मात्र धावपळ उडाली. गणेशोत्सव काळामध्येसुद्धा शिवसेना कमानीच्या जागेवरून वाद उफाळून आला होता, आता पुन्हा कार्यालयाच्या जागेवरून पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे.

जागा शिवसेनेची आहे, 'उबाठा'ची नाही

'जागा शिवसेनेची आहे, उबाठाची नाही. त्यांनी इथून बाहेर कुठंही जावं. अतिक्रमण खपवून घेणार नाही. त्यांनी चुकीचं केलं तर आम्ही सहन करणार नाही. त्यांनी अॅक्शन दिली, की आम्ही रिअॅक्शन देणारच. महापालिका हद्दीत शिवसेनेची एक जागा पूर्वीपासून आहे. पर्टवर्धन सरकार जे होते त्यांनी कार्यालयासाठी जागा दिली होती. ती जागा नियमाने आमची आहे, मात्र काही कालांतराने ती जागा कुठे गेली, हे काही लक्षात आलं नाही.'

तसेच 'आज ती जागा देण्यास महापालिका आम्हाला देण्यास तयार आहे. परंतु उबाठा गटाने त्यांचा काही संबंध नसतानाही त्यांनी अतिक्रमण करून कार्यालय उभारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.' असं एकनाथ शिंदे गटाचे मिरज (Miraj) शहरप्रमुख किरण रजपूत असं म्हणाले आहेत.

याचबरोबर 'आम्ही मूळ शिवसेना जी बाळासाहेबांच्या विचारांची आहे, त्यांनी येऊन हे काम बंद पाडून सदरचं हे काम थांबवल्याशिवाय गप्प बसणार नाही. पद बदलतात, माणसं बदलतात परंतु जागेची मूळ मालक ही शिवसेनाच राहील. खरी शिवसेना कोणती हे निवडणूक आयोगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने दाखवून दिलं आहे. शिवसेना आम्हाला दिली, धनुष्याबण चिन्हही आम्हाला दिलं. त्यांची शिवसेनाही उबाठा आहे.

त्यामुळे त्यांनी शिवसेना (Shivsena) म्हणवून घ्यायचं नाही. आम्ही शिवसेना म्हणून छातीठोकपणे सांगतो आहोत. तसं ते सांगू शकत नाहीत, त्यांना शिवसेना नावासमोर उबाठा लावावं लागतं. त्यामुळे त्यांनी केलेलं हे अतिक्रमण काढायचं आणि मूळ जागेवर आम्ही आमचं कार्यालय अगदी थाटामाटात उभारणार,' असंही रजपूत म्हणाले आहेत.

याच जागेवर आमचं काम सुरू राहणार

तर 'मागील अनेक वर्षापासून मिरज शहरातील शिवसेनेची शाखा म्हणून आम्ही इथे काम बघत होतो. पटवर्धन सरकार यांनी आम्हाला खरेदीपत्र करून दिलेलं आहे, की शिवसेना शाखा हेमंत खोकरे यांच्या नावाने आहे. आम्ही महापालिकेकडे अनेक वेळा पाठपुरावा करूनही आमच्याकडे दुर्लक्ष केलं. आम्ही आमच्या जागेवर जर कार्यालय उभारत आहोत. अतिक्रमण आणि आमचा कोणताही संबंध नाही. आमच्याकडे कागदपत्र आहेत आणि याच जागेवर आमचं काम सुरू राहणार,' असं ठाकरे गटाचे चंद्रकांत मयगुरे मिरज तालुकाप्रमुख म्हणाले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT