Sangola, 22 September : सांगोला पंचायत समितीच्या विविध विकास कामांमध्ये तसेच प्रशासकीय कामकाजात पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही, असा आरोप करत सत्ताधारी शिवसेनेचे उपसभापती अजय सरगर व इतरांनी नाराजी व्यक्त करत सोमवारी (ता. 21 सप्टेंबर) पंचायत समितीचे कार्यालयीन कामकाज दोन तास बंद ठेवले होते, त्याची तालुकाभर चर्चा झाली. पंचायत समितीत भाजपचा सभापती आहे, तर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे शिलेदार सरगर हे उपसभापती आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पंचायत समिती प्रशासन आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यात विविध विकासकामे, ग्रामपंचायतींना निधी वाटप तसेच योजनांच्या अंमलबजावणीवरून मतभेद असल्याची चर्चा आहे. अधिकारी विकासकामांच्या फाईल्स तसेच निधीच्या बाबतीत पदाधिकाऱ्यांना अपेक्षित माहिती देत नसल्याची नाराजी उपसभापती सरगर यांनी व्यक्त केली.
सोमवारी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास अजय सरगर हे कार्यकर्त्यांसह पंचायत समिती कार्यालयात आले. त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे विविध विकासकामे आणि निधीवाटपाबाबत विचारणा केली. त्यावेळी काही काळ वादाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर काही अधिकारी व कर्मचारी कार्यालयाबाहेर आले. त्यामुळे कार्यालयीन कामकाज काही काळ ठप्प राहिले.
दरम्यान, दाखले, घरकुल योजना, रोजगार हमी योजना तसेच अन्य प्रशासकीय कामांसाठी तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या नागरिकांना कार्यालयाबाहेर थांबावे लागले. कामकाज सुरळीत होण्याची प्रतीक्षा नागरिकांना तब्बल दोन तास करावी लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
ग्रामपंचायतींचे प्रशासक कळीचा मुद्दा
सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतींवर प्रशासकीय नियुक्त्या करण्यात आल्याच्या मुद्द्यावरूनही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा पंचायत समिती परिसरात होती. या नियुक्त्या पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने झाल्या नसल्याचे बोलले जात होते.
संबंधित प्रशासकीय नियुक्ती कोणाच्या सूचनेवरून झाली, याबाबतही पंचायत समिती परिसरात चर्चा सुरू होती. एकाच अधिकाऱ्यावर १३ ग्रामपंचायतींची प्रशासक म्हणून व इतरांवर एक दोन गावांचे प्रशासक म्हणून नियुक्त केल्याबाबत नाराजी असल्याचे सांगितले गेले. मात्र, त्याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
अधिकारी विश्वासात घेत नाहीत : उपसभापती सरगर
विविध विकासकामांच्या तसेच दररोजच्या प्रशासकीय कामकाजात अधिकारी आम्हाला विश्वासात घेत नाहीत. मनमानी पद्धतीने ते काम करीत आहेत. याबाबत आम्ही आमची नाराजी व्यक्त केली आहे. शासकीय कामकाज बंद ठेवणे आमचा हेतू नव्हता, असे उपसभापती अजय सरगर यांनी सांगितले.
अधिकारी मनानेच कामे करतात : झेडपी सदस्य लवटे
सांगोला पंचायत समितीच्या विविध कामांबाबत नागरिकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. अधिकारी मोठ्या प्रमाणात मनमानी कारभार करत आहेत. लोकप्रतिनिधींचे ऐकून घेण्याऐवजी अधिकारी मनानेच कामे करतात. पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत नसल्यामुळे अधिकाऱ्यांच्या विरोधात मोठी नाराजी आहे, असा दावा जिल्हा परिषद सदस्य दादा लवटे यांनी केला.
प्रशासक नियुक्तीचे अधिकार आम्हाला नाहीत : प्रभारी गटविकास आधिकारी
आज आम्ही बैठकीसाठी सोलापूरमध्ये होतो. कामकाज थोडा वेळबंद झाले असले तरी ते लगेच पूर्ववत झाले. अधिकारी कोणत्याही प्रकारची मनमानी करीत नाहीत. प्रशासक नियुक्तीबाबत आम्हाला अधिकार नसून प्रशासक नियुक्तीवरूनच झालेली आहे. त्यांच्या कामकाजाबाबत नाराजी असेल तर ती चर्चा करून निश्चितपणे सोडवण्यात येईल, असे सांगोला पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी योगेश कांबळे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.