Nivedita Mane

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

शिवसेना खासदाराच्या मातोश्री पक्षाविरोधात लढल्या अन् दणक्यात निवडूनही आल्या

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (Kolhapur District Bank Election) शिवेसेनेचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने (Nivedita Mane) यांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे त्यांनी शिवसेनेची साथ सोडत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गटातून निवडणूक लढवली होती. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

महिला प्रतिनिधी गटामध्ये निवेदिता माने यांच्यासह श्रुतिका काटकर या सत्तारूढ गटाच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत माने यांना 4 हजार 149 तर काटकर यांना 4 हजार 575 मतं मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्याचे पालकमंत्री काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्तारुढ पॅनल आहे. या निवडणुकीत महिला प्रतिनिधी गटातून माने यांनी त्यांची साथ दिली. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

सर्वाधिक चुरस ही शिरोळ तालुका विकास संस्था गटातील उमेदवार राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर (rajendra patil yadravkar) आणि गणपतराव पाटील यांच्यात होती. माजी खासदार राजू शेट्टी हे स्वत: पाटील यांचे मतदान प्रतिनिधी म्हणून केंद्रात उपस्थित होते, त्यामुळे या लढतीकडे कोल्हापूर जिल्ह्याचेच नव्हे; तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राजेंद्र यड्रावकर यांना 98 मते मिळाली, तर गणपतराव पाटील यांना 52 मते पडली. यड्रावकर हेही शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झाले आहेत. त्यामुळे शिवेसनेचे दोन नेते सत्तारूढ गटातून विजयी झाले आहेत.

भाजपचा (BJP) पाठिंबा असलेले आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांना पराभवाचा धक्का बसला आहे. नागरी सहकारी पतसंस्था गटातून शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांचे भाऊ प्रा. अर्जुन आबिटकर (Arjun Abitkar) विजयी झाले आहेत. त्यांनी 614 मते मिळवत आवाडेंचा पराभव केला. आवाडे हे भाजप कडून उमेदवार म्हणून सत्तारूढ आघाडीच्या पॅनेलमध्ये होते. त्यांना 461 मते मिळाली तर तिसरे उमेदवार अनिल पाटील यांना 160 मते मिळाली. या गटात धक्कादायक निकाल लागण्याची चर्चा एक दिवस अगोदरच रंगली होती. त्यानुसार मतदारांनीही कौल दिल्याचे दिसून आले. आवाडे यांचा पराभव करत आबिटकर हे जायंट किलर ठरले आहेत.

पन्हाळा सेवा संस्था गटातून आमदार विनय कोरे (Vinay Kore) विजयी झाले आहेत. त्यांना 243 पैकी 204 मते मिळाली. तर शाहूवाडी व आजरा येथे दोन विद्यमान संचालकांना पराभवाचा सामना करावा लागल्याने सत्तारुढ गटाला धक्का बसला आहे. प्रक्रिया गटातून विरोधी गटाचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik), बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, विकास संस्था गटात गडहिंग्लज तालुक्यातून विद्यमान संचालक संतोष पाटील, भुदरगडमधून विद्ममान संचालक व माजी आमदार के. पी. पाटील यांचे पुत्र रणजितसिंह पाटील, आजरातून सुधीर देसाई, शाहुवाडीतून रणवीरसिंह गायकवाड या सत्तारूढ गटाचे चार उमेदवार विजयी झाले. शाहुवाडीतून विद्ममान संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर तर आजऱ्यातून विद्यमान संचालक अशोक चराटी यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

भुदरगड विकास संस्था गटात रणजित पाटील यांना 144 तर त्यांचे विरोधक यशवंत नांदेकर यांना 62 मते मिळाली. शाहुवाडी विकास संस्था गटात रणवीर गायकवाड यांना 66 तर संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर यांना 32 मते मिळाली. गडहिंग्लज विकास संस्था गटात 106 पैकी तब्बल 100 मते घेऊन संचालक संतोष पाटील यांनी सलग दुसऱ्यांना या तालुक्यातून जिल्हा बँकेत प्रवेश केला. यातील सुधीर देसाई, रणवीर गायकवाड हे पहिल्यांदाच बँकेत आले आहेत. देसाई यांचे वडील दिवंगत राजाराम देसाई यांनी बँकेचे अध्यक्ष पद भूषवले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT