Shivsena-Congress-NCP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमच्या आमदार-खासदारांच्या गळ्यात मंगळसूत्र शिवसेनेचं; कुंकू मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचं आहे

आमच्या लोकप्रतिनिधींना निवडणूक आली की शिवसैनिकांची आठवण होते.

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : आमच्या लोकप्रतिनिधींना निवडणूक आली की शिवसैनिकांची आठवण होते. मात्र कंत्राट, सहकारी संस्थांमधील पदे देण्याची वेळ आली की मी, माझे कुटुंब आणि माझा गट अशी त्यांची भूमिका असते. अशावेळी शिवसैनिकाला संधी न देता ते लोकसभा, विधानसभेचा पैरा फेडतात. गावात आले की ते शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवत नाहीत, त्यांना त्यांचे बगलबच्चे लागतात. त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र शिवसेनेचे आहे. मात्र, कपाळावर कुंकू काँग्रेस-राष्ट्रवादीचेच आहे, असा घरचा आहेर शिवसेनेचे खासदार, आमदार यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. (Shiv Sena office bearers criticize their own MLAs and MPs)

कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनातील खदखद बोलून दाखवली. करवीर तालुक्याचे प्रमुख तानाजी आंग्रे म्हणाले की, ‘जिल्ह्यात शिवसैनिक फक्त जय भवानी, जय शिवाजी पुरताच उरला आहे. सहकारी संस्थांमध्ये पद देण्याची वेळ आली की ते पैरा फेडतात. त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र शिवसेनेचे आहे. पण, कपाळावर कुंकू काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच आहे.’

जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले की, ‘निवडणुकांमध्ये त्यांना शिवसैनिक लागतो. मात्र पदे देण्याची वेळ आली की शिवसैनिकांना कडीपत्याप्रमाणे बाजूला ठेवतात. म्हणूनच कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी शिवसेनेचे स्वतंत्र पॅनेल केले पाहिजे. आम्ही मातोश्रीचा आदर करतो; पण आमच्या भावनांशी खेळू नका.’ उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील म्हणाले की, ‘आमची ग्रामपंचायत वर्षानुर्षे शिवसेनेकडे आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. पण खासदार आमच्या गावात येतात, त्यांच्या बगलबच्यांकडे जातात. मग त्यांचा एखादा कार्यकर्ता फोन करून भेटायला यायला सांगतो. बाळासाहेबांच्या नावावरच ते खासदार झाले. राज्यमंत्री यड्रावकरांचा सर्वाधिक त्रास आम्हाला होतो.’

जिल्हा प्रमुख विजय देवणे म्हणाले की, ‘त्यांना निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा चेहरा लागतो, आंदोलन करून केसेस अंगावर घ्यायला शिवसैनिक चालतो. पण पद देण्याची वेळ आली की शिवसैनिक चालत नाही. शिवसैनिकाने कधी वातानुकुलीत खोलीत बसायचे नाही का? शिवसैनिकाची तक्रार करून त्यांची हाकालपट्टी करायलाही लोकप्रतिनिधी पुढे असतात. आम्हाला सत्तेत वाटा मिळत नाही. दक्षिण विधानसभा मतदार संघात शिवसैनिकांनी काही करायचे नाही. नुसते निवडणुकीला बुथ टाकून बसायचे. निवडून आल्यावर त्यांच्यावर विजयाचा गुलाल टाकायलाही कोणी जात नाही. यावेळी मुरलीधर जाधव, विराज पाटील, कुंभी-कासारी संचालक अनिल पाटील, रियाज समंजी, युवराज पोवार यांचीही भाषणे झाली.

कुंडल्या बाहेर काढू : संजय पवार

संजय पवार म्हणाले, गोकूळ दूध संघामध्ये शिवसैनिकांमुळेच परिवर्तन झाले आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकीत जर लोकप्रतिनिधी उमेदवारी देत नसतील, तर त्यांच्या सगळ्या कुंडल्या बाहेर काढू, त्यानंतर मात्र घरी येऊन उमेदवारी देतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT