Solapur University-Varun Sardesai
Solapur University-Varun Sardesai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर विद्यापीठात शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीची लिट्‌मस टेस्ट; युवा सेनेबरोबर एकत्र लढणार

विश्वभूषण लिमये

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर (Solapur) विद्यापीठाच्या (University) निवडणुका (election) शिवसेना (shivsena), युवा सेना (yuvasena) आणि संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) एकत्रितरित्या लढवणार आहेत, अशी माहिती युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी आज (ता. १० सप्टेंबर) सोलापुरात दिली. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच ही युती निवडणुकीस सामोरे जात आहेत, त्यामुळे या युतीची आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीची लिटमस टेस्ट मानली जात आहे. (Shiv Sena-Yuva Sena-Sambhaji Brigade to fight Solapur University elections together: Varun Sardesai)

गेल्या आठवड्यात गडचिरोली - चंद्रपूर विद्यापीठाच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यामध्येही शिवसेना - युवा सेना आणि संभाजी ब्रिगेड विजयी झाली आहेत. त्यामुळे हीच विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी सोलापुरातही तीच नीती अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, असेही सरदेसाई यांनी या वेळी सांगितले.

वरूण सरदेसाई हे तुळजापुरात आई तुळजाभवानीच दर्शन घेऊन आजपासून युवा सेनेच्या निर्धार अभियानाला सुरुवात करणार आहेत. यामध्ये मराठवाड्यातील ८ जिल्हे आणि बुलाढाणा जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघांचा समावेश असणार आहे.

दरम्यान, आज सोलापुरात वरुण सरदेसाई यांनी शिवसेना, युवासेना आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्तरित्या बैठक ही घेतली. त्यानंतरही सोलापूर विद्यापीठातील सिनेट, अभ्यास मंडळांच्या निवडणुकीसंदर्भात सरदेसाई यांनी एकत्र लढण्याबाबत भाष्य केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट), विद्या परिषद आणि अभ्यास मंडळे या अधिकार मंडळांसाठी येत्या २९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. अधिसभेच्या प्राचार्य मतदारसंघातून १० सदस्य, संस्था प्रतिनिधीसाठी ६ , शिक्षकांसाठी १०, पदवीधर मतदारमधून १०, तर विद्यापीठ शिक्षकमधून तीन सदस्य निवडून द्यायचे आहेत. विद्या परिषदेसाठी प्रत्येक विद्या शाखेचे दोन शिक्षक निवडून येणार आहेत. एकूण चार विद्याशाखा आहेत. त्यानुसार सदस्य निवडणुकीद्वारे निवडले जाणार आहेत. त्याचबरोबर अभ्यास मंडळासाठी ही निवडणूक होणार आहे. प्रत्येक अभ्यास मंडळावर तीन महाविद्यालयीन अथवा मान्यताप्राप्त संस्थेचे विभागप्रमुख निवडले जाणार आहेत.

ता. १२ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. येत्या १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहे. उमेदवारी अर्जांवर १७ सप्टेंबर रोजी कुलगुरूंकडे अपील करता येणार आहे. पात्र उमेदवारांच्या नावाची यादी रविवारी (ता. १८ सप्टेंबर) निवडणूक पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानुसार २९ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत शहर व जिल्ह्यातील १६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT