Gadhinglaj News : ‘‘राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळमध्ये काय केले, हे आम्हाला माहीत नाही का? युतीत राहूनच त्यांनी वेळोवेळी विश्वासघात करायचा आणि भाजपनेच केवळ युतीधर्म पाळायचा? असे कसे होईल. त्यामुळे गडहिंग्लजची आगामी नगराध्यक्ष पोटनिवडणूक भाजप ताकदीने लढणार आणि जिंकणारही असून, गडहिंग्लज शहर मुश्रीफमुक्त करणार आहे’’, असा निर्धार आमदार शिवाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
आगामी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत भाजपच्या भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. ते म्हणाले, एखाद्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांना निवडणूकच ही संधी असते. गडहिंग्लजचे नगराध्यक्षपद आमच्या हक्काचे आहे.
युतीधर्मावर भाजपनेच का विचार करावा. सरकारमध्ये स्वतः कॅबिनेट असतानाही मुश्रीफ यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते दुष्काळासाठी आंदोलन करतात. त्यांना विश्वास देऊन मुश्रीफांनी आंदोलन थांबवायला पाहिजे होते. युतीधर्म म्हणायचे व विश्वासघात करायचा ही त्यांची पद्धत आहे. मग भाजपने नगराध्यक्ष निवडणूक का लढवू नये?
ते म्हणाले, गडहिंग्लज दुष्काळी यादीत आणण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. श्रेय घेण्याच्या भानगडीत मी कधी पडत नाही. दोन-तीन महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांशी संपर्कात होतो. माझ्यासाठीचा मुख्यमंत्र्यांचा कोरा धनादेश कधी वटवायचा? हे मला चांगले माहीत आहे. ‘शक्तिपीठ’ला विरोध करणारे संपतील शक्तिपीठसाठी मोजणी प्रक्रियेला चंदगड व आजऱ्यात विरोध झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, या भागातील रोजगार, उद्योग व शेतीसमोरील दुष्काळ संपवायचा असेल तर शक्तिपीठ गरजेचा आहे.
आजपर्यंतच्या नेत्यांनी एकही मोठा प्रकल्प न आणल्याने बेरोजगारी मोठी आहे. विरोध अधिक होतो, तोच प्रकल्प ताकदीने पूर्ण होतो. शक्तिपीठचेही तसेच होईल. त्याला विरोध करणारे संपून जातील. ''स्वीकृत'' कोणत्या तोंडाने मागू... पाटील म्हणाले, ‘‘गोकुळ निवडणुकीत मुश्रीफ यांनी एकीकडे युतीधर्म म्हणत होते, तर दुसऱ्या बाजूने सभासदांच्या शपथा घेऊन मतदान फिरविले. यामुळे आजरा व चंदगडमध्ये भाजपचे उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे मी कोणत्या तोंडाने स्वकृीत संचालक मागू?
कागल दुष्काळी करून घ्या... आमदार पाटील म्हणाले, मुश्रीफ यांनी गडहिंग्लजच्या दुष्काळी निर्णयाचे श्रेय घेण्यापेक्षा मतदारसंघातील वंचित कागल तालुक्याला दुष्काळी यादीत आणावे. माझ्या मतदारसंघात काम करण्यासाठी मला कोणत्या नेत्याची अगर मंत्र्यांची गरज लागत नाही. माझ्यामागे देवाभाऊ खंबीर आहेत.