Shivaji Patil-Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif : 'माझ्यामागे देवाभाऊ खंबीर', भाजप आमदाराचा इशारा; शिवाजी पाटलांना मुश्रीफांनी मनावर घेतलचं नाही; म्हणाले, 'फारसं बोलणं...'

Hasan Mushrif Response To Shivaji Patil Controversy गोकुळमध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली असून चंदगडमधील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील गोकुळचे नवे अध्यक्ष बनले आहेत. यानंतर आता आमदार शिवाजी पाटील यांनी पुन्हा एकदा मंत्री हसन मुश्रीफ यांना टार्गेट केलं आहे.

Aslam Shanedivan

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे आमदार शिवाजी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. शिवाजी पाटील यांनी एका नेत्यामुळे जिल्ह्याचे राजकारण बिघडल्याचा आरोप करत मुश्रीफ यांना लक्ष्य केले होते. आता पुन्हा एकदा मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधत गडहिंग्लज शहर मुश्रीफमुक्त करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली असून, शिवाजी पाटील यांच्यावर अधिक बोलणे टाळत सूचक टोला लगावला आहे.

भाजप आमदार शिवाजी पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळमध्ये काय केले, हे आम्हाला माहीत नाही का? युतीत राहून वेळोवेळी विश्वासघात करायचा आणि भाजपनेच केवळ युतीधर्म पाळायचा, असे कसे होईल? त्यामुळे गडहिंग्लजच्या आगामी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत भाजप ताकदीने उतरणार असून, ही निवडणूक जिंकून गडहिंग्लज शहर मुश्रीफमुक्त करणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. एखाद्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांना निवडणूक हीच संधी असते. गडहिंग्लजचे नगराध्यक्षपद आमच्या हक्काचे असल्याचा दावाही शिवाजी पाटील यांनी केला होता.

'मुख्यमंत्र्यांचा कोरा धनादेश कधी वटवायचा, हे मला माहीत आहे'

गडहिंग्लज तालुका दुष्काळी यादीत समाविष्ट करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केले असल्याचे शिवाजी पाटील यांनी सांगितले होते. श्रेय घेण्याच्या भानगडीत आपण कधी पडत नाही. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांशी संपर्कात होतो. माझ्यासाठी मुख्यमंत्र्यांचा कोरा धनादेश कधी वटवायचा, हे मला चांगले माहीत आहे, असे सूचक विधान शिवाजी पाटील यांनी केले होते.

याचवेळी हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लजच्या दुष्काळी निर्णयाचे श्रेय घेण्यापेक्षा मतदारसंघातील वंचित कागल तालुक्याला दुष्काळी यादीत आणावे, असा सल्लाही त्यांनी दिला. माझ्या मतदारसंघात काम करण्यासाठी मला कोणत्याही नेत्याची किंवा मंत्र्याची गरज नाही. माझ्यामागे देवाभाऊ खंबीर आहेत, असे म्हणत त्यांनी मुश्रीफ यांना अप्रत्यक्ष आव्हान दिले होते.

मुश्रीफांनी शिवाजी पाटलांच्या वक्तव्यावर बोलणे टाळले

शिवाजी पाटील यांच्या या टीकेवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाजी पाटील यांनी नेमके काय वक्तव्य केले, याची मला माहिती नाही. मी येथे नव्हतो, पुण्यात होतो. मात्र, माझ्या कार्यकर्त्यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना उत्तर दिले आहे. यावर मी फारसं बोलणं इष्ट समजत नाही, असे म्हणत मुश्रीफ यांनी शिवाजी पाटील यांच्या आव्हानाला फारसे महत्त्व दिले नाही.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून शिवाजी पाटलांना प्रत्युत्तर

दरम्यान, गडहिंग्लज 'राष्ट्रवादी आणि मुश्रीफमुक्त' करण्याची भाषा करणाऱ्या आमदार शिवाजी पाटील यांना आगामी विधानसभा निवडणुकीनंतर ठाण्यात शोधावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकातून दिला आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केल्याबद्दल त्यांनी शिवाजी पाटील यांचा निषेधही नोंदवला.

गडहिंग्लज तालुका दुष्काळी जाहीर करण्याचे श्रेय मिळत नसल्याच्या द्वेषातून आणि अस्वस्थतेतूनच शिवाजी पाटील यांनी विनाकारण हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे गडहिंग्लजमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला असून, आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वादाला आणखी धार येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT