सांगली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षातील काही लोकांना रोखले असते तर माझा येथे पराभव झालाच नसता. उलट त्यांनी पक्षांतर्गत खेळींना साथ देत आम्हाला दमवण्याचे काम केले. भाजपकडून संस्था पुनर्बांधणीसाठी साथ आणि कार्यकर्त्यांना चांगली वागणूक मिळाली नाही, असा थेट आरोप करत माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी सम्राट महाडिक यांच्यावरही निशाणा साधला.
भाजपच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदत घेत खदखद व्यक्त केली. श्री. नाईक येत्या २ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. डोंगरी भागाचा विकास आणि अडचणीतील संस्थांच्या बांधणीसाठी मदत या शब्दावर आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्री. नाईक म्हणाले, ‘‘भाजप प्रदेशाध्यक्षांचे धोरण एकाला जवळ करायचे आणि दुसऱ्याला त्रास देणाऱ्या खेळ्या करत रहायचे, असे आहे. कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचा वेगळा हेतू आहे, मात्र त्याचा परिणाम आम्हाला इथे सहन करावा लागला. वेगळ्या खेळ्या करून त्यांनी हेतू पुरस्कर भाजप कार्यकर्त्यावर अन्याय केला. त्यांच्याकडून ज्या पद्धतीची वागणूक हवी होती, ती मिळाली नाही. संस्था पुनर्बांधणीसाठी मदत नाहीच. उलट आम्हाला दमवण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर जिल्ह्यात परिस्थिती सुसंगत करण्याच्या प्रयत्नात आमची अडचण केली. कोणाला पक्षात घ्यायचे, त्यांचे काय करायचे, या मुद्यावर आमचे काहीच म्हणने नाही. त्यांना आता काय करायचे, ते करूदेत. आम्ही भाजप पदाचे व सभासदत्वाचे राजीनामे दिले आहेत.’’
ते म्हणाले, ‘‘कोरोना काळात संस्था आर्थिक अडचणीत आल्या. त्या पुनर्जीवित करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांकडे मदत मागितली. प्रतिसाद मिळाला नाही. संस्था सक्षम असल्या तर कार्यकर्त्यांना बळ आणि विकासाला गती मिळते. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमच्या अडचणीतील संस्थाना मदतीची तयारी दर्शवली. वाकुर्डे योजना, वारणा कालवा व चांदोली पर्यटनाच्या कामाला गती मिळावी हा आमचा प्रामाणिक हेतू आहे. त्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांनी शब्द दिला आहे. हा पक्ष प्रवेशाचा निर्णय एकट्याने नाही तर आमच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.’’
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.