Ahmednagar Political News : नगर जिल्हा बँकेच्या कारभारावरून आमदार प्राजक्त तनपुरे आणि माजी मंत्री, बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्यात घमासान सुरू आहे. तनपुरे आणि कर्डिले यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने जिल्ह्यातील राजकारण तापले असून, याचा आगमी निवडणुकीवर परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.
नगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनमानी कारभार करतात. बँकेमध्ये मनमानी कारभाराची ईडी चौकशी झाल्यास अनेक भ्रष्टाचाराचे पुरावे बाहेर पडतील, असा गंभीर आरोप आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली होता. यावर कर्डिले यांच्यासह जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने तनपुरेंना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
'नगर बँकेने जिल्ह्यातील सभासद आणि सहकारी संस्थांना बळकटी दिली आहे. साखर कारखानदारीला साथ दिल्याने जिल्ह्यातील कारखाने सुस्थितीत आहेत. त्यामुळे सहकारी संस्थांना अडचणीत आणणाऱ्या प्रवृत्तींना नावलौकिक असलेल्या जिल्हा बँकेवर चुकीचे आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही,' असा घणाघात शिवाजीराव कर्डिले व संचालक मंडळाने आमदार तनपुरेंवर केला आहे. (Latest Political News)
'अनेक साखर कारखाने बँकेचे कर्ज नियमित फेड करीत असून, त्यांच्यांकडे थकबाकी राहत नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्राचा व शेतकऱ्यांचा या कारखान्याने विकास केला. मात्र, तनपुरे यांच्याकडे मोठी थकबाकी असल्याची माहितीही (Shivaji Kardile) शिवाजी कर्डिलेंनी दिली. 'जिल्हा बँकेच्या कारभारावर टीका करणाऱ्यांनी बाबूराव बापूजी तनपुरे साखर कारखाना, मुळा शेतकरी सूतगिरणी, राहुरी तालुका सूतगिरणी अशा अनेक सहकारी संस्थांची सत्ता भोगली आहे. या संस्थांच्या नावावर आमदार तनपुरे यांचे वडील माजी खासदार प्रसादराव तनपुरेंनी जिल्हा बँकेकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले होते. मात्र, संबंधित संस्थांचा कारभारात कुचराई केली. परिणामी आजही त्या संस्थांकडे बँकेची मोठी थकबाकी आहे,' असा गंभीर आरोपही कर्डिलेंनी केला.
'प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) संस्थेचा कारभार सभासद व शेतकरीहिताऐवजी स्वत:च्या विकासासाठी व राजकारणासाठीच करत आले आहेत. तनपुरे घराण्यामुळे राहुरी तालुक्यातील अनेक संस्था अडचणीत येऊन बंद पडल्या आहेत. त्यांच्या या कारभारामुळे या भागातील सामान्य शेतकऱ्यांबरोबर इतरही ग्रामीण भागातील कामगार व व्यावसायिकांच्या विकासाला खिळ बसली,' अशी टीका जिल्हा बँकेच्या संचालकांसह कर्डिलेंनी तनपुरेंवर केली.
'सहकारी संस्थांना अडचणीत आणणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांना नावलौकिक असलेल्या जिल्हा बँकेवर चुकीचे आरोप करणेचा नैतिक अधिकार नाही. बँकेचे संचालक मंडळ सर्वतोपरी चर्चा करूनच निर्णय घेतात. या बँकेत कोणत्याही प्रकारचे मनमानी कारभार होत नाही. प्रत्येक गोष्टींवर संचालक मंडळात चर्चा होऊनच निर्णय होतो,' असा खुलासा करत कर्डिलेंनी बँकेच्या कारभाराबाबत कोणीही जनतेची व सभासदाची दिशाभूल करू नये, असे तनपुरेंना सुनावले. (Maharashtra Political News)
बँकेस सातत्याने ऑडिट वर्ग अ राहिलेला आहे. जिल्हा बँकेने दोन गाड्यांची खरेदी केली असली तरी त्याचा उपयोग हा जिल्ह्यातील शेतकरीहितासाठी व बँकेचा कारभार पाहण्यासाठी होतो. तनपुरे घराण्याने यापूर्वी कोणकोणत्या गाड्या वापरल्या, कशा वापरल्या हे जनतेला माहिती आहे. आमदार तनपुरेंच्या प्रसाद शुगर कारखान्याच्या गैरव्यवहाराबाबत ईडीने कारखान्याची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच याबाबत दोषारोपपत्र दाखल झालेले आहे. अशी परिस्थिती असताना त्यांनी जिल्हा बँकेच्या कारभाराची चौकशीची मागणी करणे, हास्यास्पद असल्याची खोचक टीकाही कर्डिलेंनी केली.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.