Shivendraraje Bhosale-Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde-Shivendraraje : शिवेंद्रराजेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली अन्‌ अवघ्या 24 तासांच्या आत मंजूर झाला 6 कोटींचा निधी

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Fund : साताऱ्यातील पोवई नाका येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांचा २५ फूट उंच पुतळा उभारण्यासाठी आणि परिसर विकासासाठी ५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 13 November : सातारा शहरातील पोवई नाका येथील शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा २५ फूट उंचीचा पुतळा उभारण्यासाठी तसेच शिवतीर्थ परिसर विकासासाठी निधी मिळावा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दरे गावी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. भोसले यांनी रात्री शिंदेंची भेट घेऊन निधीची मागणी केली आणि २४ तासांच्या आत निधीचा शासन निर्णय निघाला. शिवेंद्रराजेंचा पाठपुरावा आणि शिंदे यांची तत्परता यामुळे शिवपुतळ्यासाठी ५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी अवघ्या काही तासांत मंजूर झाला आहे.

पोवई नाक्यावरील शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा २५ फुटी पुतळा आणि शिवतीर्थ परिसराचा विकासासाठी निधी मिळावा, यासाठी बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दरे गावी जाऊन भेट घेतली होती. बैठकीला सातारचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, माजी उपनगराध्यक्ष तथा भाजप गटनेते अविनाश कदम, नगरसेवक फिरोज पठाण उपस्थित होते.

शिवेंद्रराजेंच्या सूचनेनुसार सातारा नगरपालिकेने नगरविकास विभागाकडे शिवतीर्थ विकास परिसराच्या विकास आराखडा पाठवला होता. उपमुख्यमंत्री शिंदे हे दरे गावी मुक्कामी आल्याचे समजताच शिवेंद्रराजे सायंकाळी साताऱ्यातून तातडीने दरेगावी रवाना झाले. दरे येथे शिंदेंच्या निवासस्थानी जाऊन शिवेंद्रराजेंनी त्यांची भेट घेतली.

शिवतीर्थवर छत्रपती शिवरायांचा २५ फुटी पुतळा तसेच त्यासाठीचा १५ फुटांचा चबुतरा उभारणी व या अनुषंगाने आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी नगरविकास विभागाकडून त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मंत्री भोसले यांनी शिंदेंकडे केली. शिंदे यांनी तत्काळ मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून त्वरित निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आणि अवघ्या २४ तासांच्या आतमध्ये निधी मंजुरीचा शासन निर्णय झाला.

नगर विकास विभागाने आज (शुक्रवारी, ता. १३ नोव्हेंबर) सकाळीच 'नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेतून' या कामांसाठी ५ कोटी ७५ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. शिवेंद्रसिंहराजेंनी मागणी करताच २४ तासांच्या आत शिंदे यांनी हा निधी मंजूर केल्याने शिवप्रेमींमधून आनंद व्यक्त होत आहे. निधी उपलब्ध करून देताच शिवेंद्रसिंहराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचे आभार मानले आहेत.

असा असेल पुतळा

शिवतीर्थ येथे तोफेवर हात ठेवलेला शिवपुतळा असून हुबेहूब तसाच नवीन २५ फुटी शिवपुतळा उभारण्यात येणार आहे. हा नवीन पुतळा भारताचे ख्यातनाम, सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार यांनी साकारलेला आहे. चबुतऱ्याची उंची १५ फूट आणि २५ फुटी पुतळा अशी एकूण ४० फूट उंची असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरच उभारण्यात येईल, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT