सातारा : जरंडेश्वर, ईडीबाबतची माहिती देण्यास जिल्हा बँकेने कोणताही नकार दिलेला नाही. केवळ कायदेशीर सल्ला घेऊनच आम्ही त्यांना माहिती देणार आहोत. जरंडेश्वरला कर्ज देताना संचालक मंडळाच्या बैठकीवेळी तिसऱ्या क्रमांकावर त्यांची सही आहे. त्यामुळे त्यांनी बँकेबद्दल चुकीची माहिती जनतेत पसरवू नये. माझ्यासह सर्व संचालकांना दिवाळी गोड जावी. सर्वजण सुखीसमाधानी राहावेत, असे मला वाटते. पण, उदयनराजेंना गोडवा हवा की अन्य काही, हे त्यांचे त्यांनीच ठरवावे, असा खोचक टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंना लगावला आहे.
जिल्ह्यात बँकेत येऊन उदयनराजेंनी आज पुन्हा संचालक मंडळावर हल्लाबोल केला. त्यानंतर बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांना बँकेत पत्रकार परिषद घेऊन त्याला प्रतिउत्तर दिले. तसेच बँकेबद्दल चुकीची माहिती देऊन सभासद व जनतेत बदनामी करू नका, असा सल्लाही दिला. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सध्या खासदार साहेबांकडून बँकिंग बाबत चुकीची माहिती मांडली जात आहे. जिल्हा बँकेचा कोणताही विषय आला की राज्यात व देशात चर्चा होते. सातारा जिल्ह्यातील निर्णय जिल्ह्यातच होतात. कारण जिल्ह्यातील नेते मंडळीच हा निर्णय घेतात. सर्वसमावेश पॅनेलच निर्णय जिल्ह्यातील नेते एकत्र बसून घेणार आहेत. चर्चा ही आमच्यातच होतंय. बाहेरच्या जिल्ह्यातील कोणीही येथे येत नाही.
ईडीच्या विषयावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, बँकेची कोणतीही ईडीची चौकशी सुरू नाही. ईडीने जरंडेश्वर कारखान्याच्या कर्ज प्रकरणाची माहिती मागीतली होती. ती आम्ही संचालक मंडळाच्या बैठकीत ठेऊन दिलेली आहे. पण, खासदार साहेब या बैठकीला गैरहजर होते. ते उपस्थित राहिले असते तर त्यांना माहिती मिळाली असती. त्यांनी मागितलेली माहिती मिळणार आहे. त्यांचा तो अधिकार आहे. पण, कायदेशीर सल्लागाराला विचारूनच आम्ही त्यांनी मागितलेली माहिती देणार आहोत. याबाबतचे पत्रही बँकेने त्यांना दिलेले आहे.
सर्व समावेशक पॅनेलमध्ये डावलले जातंय म्हणून उदयनराजे असे आरोप करत आहेत का, यावर ते म्हणाले, आजपर्यंत पक्ष म्हणून कोणीही बँकेची निवडणूक लढविली नाही. कोणत्याही पक्षाचे पॅनेल झालेले नाही. यावेळेसही पक्षविरहित पॅनेल आहे. त्यांना पॅनेलमध्ये घ्यायचे का नाही घ्यायचे याचा अधिकार मला नाही. त्यातून त्यांनी बँकेबद्दल चुकीची माहिती जिल्ह्यात आणि सभासदांपुढे पसरवू नये. इन्शुरन्सचा विषयाबद्दल सांगता शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, बँकेला १०३ कोटींचा किंवा दुसऱ्यांदा ७३ कोटींचा प्रमियम भरणे शक्य नव्हते. आजपर्यंत आम्ही प्रिमियमपेक्षा जास्त क्लेम शेतकऱ्यांना दिलेला आहे.
त्यामुळे राष्ट्रीयकृत इन्शुरन्स कंपन्यांशी आमची चर्चा सुरू आहे. त्यामुळे ही चर्चा व मंजूरी घेण्यामध्ये विलंब झालेला आहे. आज ना उद्या ते होईल. आहे त्या परिस्थितीत प्रिमियम भरला असता तर तो बँकेच्या पैशाची उधळपट्टी झाली असती. त्यामुळे इन्शुरन्सची योजना थोडी लांबली. जरंडेश्वरला कर्ज पुरवठा केलेला आहे. तो नाबार्ड आणि आरबीआच्या धोरणानुसार केलेले आहे. प्रत्येक वर्षी बँकेचे आरबीआय व नाबार्ड आणि स्टॅट्युटरी ऑडीट होते. त्यामुळे जर आमचा कर्ज पुरवठा चुकीचा असता तर ऑडिटमध्ये आक्षेप आला असता. पण असे कुठे झालेले नाही.
जरंडेश्वरचे हप्ते वेळच्यावेळी आलेले आहेत. संचालकांच्या एका बैठकीवेळी जरंडेश्वरला शंभर कोटींचे कर्ज दिले होते. त्यावेळी उदयनराजेंही बैठकीला उपस्थित होते. त्यांची याबाबत मिटिंगच्या प्रोसिडींगवर तीन नंबरला सही आहे. हे चुकीचे कर्ज होते तर तुम्ही विरोध का केला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निवडणूक निवडणुकीच्या मार्गाने होऊ देत. ज्यांच्या मागे मतदार नाहीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागेल म्हणून बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. आजपर्यंत जिल्हा बँकेच्या संचालकांच्या ८२ बैठका झाल्या. त्यापैकी ६३ बैठकांना उदयनराजे उपस्थित राहू शकलेले नाहीत. त्यांनी कार्यबाहुल्यामुळे रजा घेतली होती. माझ्यासह सर्व संचालकांना दिवाळी गोड जावी. दिवाळीच्या आनंदात सर्वजण सुखीसमाधानी राहावेत, असे मला वाटते. पण, जिल्हा बँकेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने उदयनराजेंना दिवाळीचा गोडवा हवा की अन्य काही... हे त्यांचे त्यांनी ठरवावे, असा टोलाही शिवेंद्रसिंहराजेंनी लगावला.
चुकीचे सल्ले कोण देते....
उदयनराजेंचा असे चुकीचे सल्ले कोण देते, या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, त्यांचे मार्गदर्शक समर्थक त्यांना चुकीचे सल्ले देत असतील. मुळात आपल्या सोबत सातत्याने राहणाऱ्या कार्यकर्त्यांचे किती ऐकावे, हे ज्याचे त्यांनी ठरवावे. गोडोलीतील की भरतगावच्या सल्लागाराने त्यांना चुकीचा सल्ला दिला, या विषयी विचारले असता शिवेंद्रसिंहराजेंनी मला खरोखरच याची माहिती घ्यावी लागणार आहे, असे मिश्किलपणे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.