shivendraraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शिवेंद्रसिंहराजेंची जादा पाच जागांची मागणी; राष्ट्रवादीपुढे जागा वाटपाचा पेच

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील या दोघांना दहा जागा दिल्यास उर्वरित अकरा जागांमध्ये इतर सर्वांचा समावेश करावा लागणार आहे.

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना सोबत घेऊन पॅनेल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता जागा वाटपाचा मुद्दा असून सर्वाधिक मते सातारा तालुक्यात असल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा बँकेत पाच जागांची मागणी केली आहे. यामध्ये इतर मागासप्रवर्ग, अनुसूचित जाती, जमाती, महिला राखीव, बँका पतसंस्था मतदारसंघ आणि मजूर आणि पाणी पुरवठा मतदारसंघाचा समावेश आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोनच दिवस उरले आहेत. त्यामुळे दिग्गज नेते आगामी दोन दिवसांत अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजेंना सामावून घेऊन निवडणूक लढण्यात येणार आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सातारा तालुका विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून बँकेवर संचालक आहेत. तसेच ते विद्यमान अध्यक्षही आहेत. यासोबतच सातारा तालुक्यात जिल्हा बँकेची सर्वाधिक मते आहेत. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजेंभोवती जिल्हा बँकेचे सर्व राजकारण तसेच निवडणूक फिरणार आहे.

राष्ट्रवादीच्या पॅनेलमध्ये सामावून घेतले असले तरी मतदारांची संख्या जास्त असल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी यावेळेस पाच जादा जागांची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे केली आहे. यामध्ये इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्ग, महिला राखीवची एक तसेच बँका व पतसंस्था मतदारसंघ आणि मजूर, औद्योगिक विणकर व पाणी पुरवठा मतदारसंघाचा समावेश आहे.

त्यामुळे पाच जागांच्या मागणीमुळे राष्ट्रवादीपुढे पेच निर्माण झाला आहे. कारण सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनीही चार जागांची मागणी केली आहे. जिल्हा बँकेत संचालकांच्या २१ जागा असून यामध्ये सोसायटीच्या अकरा, संस्था मतदारसंघाच्या पाच आणि राखीवच्या पाच जागांचा समावेश आहे. त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील या दोघांना दहा जागा दिल्यास उर्वरित अकरा जागांमध्ये इतर सर्वांचा समावेश करावा लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे जागा वाटपाचा पेच उभा राहिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT