shivendraraje Bhosale
shivendraraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

जिल्हा बँकेसाठी शिवेंद्रसिंहराजेंचे शक्तीप्रदर्शन; जागा वाढवून देण्याची मतदारांची मागणी...

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : सातारा जिल्हा बँकेवर नेहमीच सातारा तालुक्याचे वर्चस्व राहिले असून जिल्हा बँकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले जो निर्णय घेतील, त्याला पूर्णपणे पाठिंबा देण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या सातारा तालुक्यातील मतदारांनी एकमुखी जाहीर केला. दरम्यान, सातारा तालुक्यात सर्वाधिक मतदार संख्या असल्याने किमान एक जागा वाढवून देण्याची मागणीही मतदारांनी केली. यावेळी सातारा तालुक्यातील मतदारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा तालुक्यातील जिल्हा बँकेचे मतदार आणि पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मेळावा घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील कै. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथील मेळाव्याला बँकेच्या विकास सेवा सोसायटी, खरेदी विक्री संघ, कृषी उत्पादन प्रक्रिया, नागरी बँका- नागरी पतसंस्था, गृहनिर्माण व दूध उत्पादक संस्था, औद्योगिक विणकर व मजूर ग्राहक संस्था- पाणीपुरवठा संस्था मतदारसंघातील सर्व मतदार उपस्थित होते.

शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती सतीश चव्हाण, किरण साबळे पाटील, वनिता गोरे, माजी सदस्य राजू भोसले, विद्यमान सदस्य प्रतीक कदम, जेष्ठ नेते लालासाहेब पवार, बापू साळुंखे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष रविंद्र कदम, विद्यमान संचालक अनिल देसाई, प्रकाश बडेकर, कांचन साळुंखे, पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर, उपसभापती अरविंद जाधव, सातारा पालिकेचे विरोधी पक्षनेते अशोक मोने, अमोल मोहिते, कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव सावंत यांच्यासह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी लालासाहेब पवार, सतीश चव्हाण, राजू भोसले आदींनी मनोगत व्यक्त केले. गेल्या पाच वर्षात बँकेचे अध्यक्ष म्हणून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी उठावदार आणि चांगले काम केले आहे. एकूण मतदानापैकी सुमारे ४५० मतदान एकट्या सातारा तालुक्याचे आहे. त्यामुळे सातारा तालुक्याला संचालक पदाची किमान एक जागा वाढवून द्यावी, तसेच उमेदवार ठरवण्याचे अधिकार सर्वस्वी शिवेंद्रसिंहराजे यांना द्यावेत, अशी एकमुखी मागणी मेळाव्यात सर्व मतदार आणि उपस्थितांनी केली. बँकेच्या निवडणुकीसाठी शिवेंद्रसिंहराजे जो निर्णय घेतील त्याला पूर्ण पाठिंबा राहील, असा ठराव मेळाव्यात उपस्थित सर्वांनी केला. दरम्यान, जिल्हा बँकेचा कारभार राजकारणविरहित असल्याने ही निवडणुकही अपेक्षेप्रमाणे पक्ष विरहित होईल. त्यामुळे तालुक्यातील मतदारांच्या मागण्या आणि भावना संबंधितांकडे पोहचवू आणि सकारात्मक निर्णय घेऊ, असेही शिवेंद्रसिंहराजे यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT