Solapur ZP Meeting Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivratna Name Change : मोहिते पाटलांच्या कार्यकाळात दिलेले सोलापूर ZPच्या सभागृहाचे 'शिवरत्न' नाव हटवले...

Solapur ZP Shivratna Hall Name Change to BJP : सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘शिवरत्न’ सभागृहाचे ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृह’ असे नामकरण करण्यात आले असून या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 04 August : सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक आज अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या बैठकीत मोहिते पाटील यांनी दिलेले सोलापूर जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाचे ‘शिवरत्न’ हे नाव हटवून त्याला ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृह’ असे नाव देण्यात आले आहे, त्यामुळे जिल्ह्याचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि माजी राज्यमंत्री (स्व) प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या यांच्या कार्यकाळात सोलापूर जिल्हा परिषदेतील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाला शिवरत्न असे नाव देण्यात आलेले आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या प्रांगणात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे.

मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील बंगल्यापासून अनेक संस्थांना शिवरत्न हे नाव देण्यात आले आहे. तसेच भाजपची सत्ता आल्यापासून मोहिते पाटील यांच्या विरोधात संघर्ष तीव्र झाला आहे. जिल्हा परिषद, विधान परिषद निवडणुकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संघर्ष शिगेला पोचला आहे. त्यातूनच ‘शिवरत्न’ हे नाव हटविण्याची घटना पुढे आल्याची चर्चा आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी सभागृहाचे ‘शिवरत्न’ हे नाव बदलून ‘भारतरत्न अटबिहारी वाजपेयी सभागृह’ करण्याचा ठराव मांडला. उपाध्यक्ष पवार यांनी मांडलेला ठराव एकमताने मंजूर करण्यात आला, त्यामुळे जिल्हा परिषदेबरोबर अनेक वर्षे जोडलेले आणि मोहिते पाटील यांनी दिलेले शिवरत्न हे नाव आता झेडपीतून पुसले जाणार आहे. यावर मोहिते पाटील समर्थकांमधून काय प्रतिक्रिया येतात, हे पाहावे लागणार आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे शिवरत्न नाव बदलण्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे विरोधकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या ठरावासोबतच इतरही अनेक महत्वपूर्ण या सभेत मंजूर करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील ११ तालुक्यांत ११ आदर्श शाळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातून प्रत्येक तालुक्यात दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे.विकास कामांना गती देण्यासोबतच त्याची गुणवत्ता, पारदर्शकता आणि नागरिकांना प्रभावी सेवा मिळावी, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

डी. वाय. पाटलांना श्रद्धांजली अर्पण

दरम्यान, बैठकीच्या सुरुवातीलाच माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर स्थायी समितीच्या २५ जूनला झालेल्या बैठकीचे कार्यवृत्त वाचून कायम करण्यात आले.

या वेळी शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतनसिंह केदार, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समिती सभापती अमृता वाघे, समाजकल्याण समिती सभापती संस्कृती सातपुते, समिती सदस्य पृथ्वीराज माने, आदिनाथ देशमुख, रश्मी बागल, बालाजी नरुटे आणि रमेश श्रीमंत भांजे, तसेच सर्व अधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT