Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena Mahaadhiveshan : शिवसेनेचे अधिवेशन कोल्हापुरातच का ? बाळासाहेबांची जी इच्छा, तेच मुख्यमंत्री शिंदेंनी केलं

Shivsena Mahaadhiveshan In Kolhapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाअधिवेशनासाठी कोल्हापूर शहरच का निवडले ?

Rahul Gadkar

kolhapur News : शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन कोल्हापुरात आजपासून पार पडत आहे. शनिवारी कोल्हापुरातील गांधी मैदानात सभा होऊन या महाअधिवेशनाची सांगता होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाअधिवेशनासाठी कोल्हापूर शहरच का निवडले ? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. (Shivsena Mahaadhiveshan)

कोल्हापुरातून एखादी घोषणा केल्यास त्याचा राज्यातील शिवसैनिकांवर प्रभाव राहणार का ? असा प्रश्न आता शिवसैनिकांना पडला आहे. मात्र, या अधिवेशनासाठी जागेची निवड करत असताना त्यामागेही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाच विचार आणि प्रथा जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज्या वेळी लोकसभा-विधानसभा निवडणूक लागतात, त्यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे त्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातूनच करत होते. करवीर निवासिनी श्री आई अंबाबाई देवीचे दर्शन घेऊनच प्रचाराचा नारळ फोडला जात होता. त्यानंतर ऐतिहासिक बिंदू चौकात सभा घेऊन शिवसैनिकांना आवाहन करत होते. बाळासाहेब ठाकरे आणि कोल्हापूरचे नाते अगदी अतूट नाते होते. त्यांना कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिवसेनेचे असावेत असे वाटत. मात्र, त्यांच्या हयातीत ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

कोल्हापूर हा सुरुवातीपासून राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. अशा परिस्थितीत शिवसेना काँग्रेसशी संघर्ष करत शेतकरी कामगार पक्षासोबतही संघर्ष राहील. त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाची ताकद या जिल्ह्यात होती. मात्र, बेरजेच्या राजकारणात जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेहमीच प्राबल्य राहिले आहे. शिवसेनेकडून पहिल्यांदाच 1991 मध्ये लोकसभेच्या रिंगणात पहिल्यांदा उमेदवार उतरवण्यात आला. तेव्हापासून ते 2014 पर्यंत शिवसेनेला विजयाने हुलकावणी दिली.

1991 पासून शिवसेनेने जिल्ह्यात लोकसभा निवडणूक लढवली. प्रत्येक वेळी शिवसेनेचे उमेदवार नंबर दोन स्थानी राहिला. शिवसेनेकडून पहिल्यांदा 1991 मध्ये रामभाऊ फाळके, 1996 मध्ये रमेश देव, 1999 मध्ये विक्रमसिंह घाटगे, 1999 मध्ये मेजर जनरल शिवाजीराव पाटील, 2004 मध्ये धनंजय महाडिक, 2009 मध्ये विजय देवणे, 2014 आणि 2019 मध्ये संजय मंडलिक यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली.

केवळ 2019 च्या निवडणुकीचा अपवाद वगळता शिवसेनेला एकही विजय मिळाला नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत मात्र कोल्हापुरात लोकसभेवर भगवा फडकला नाही, पण 2019 च्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागांवर शिवसेनेचा भगवा फडकला.

शिवसेनेची पहिली सभा कोल्हापुरात

6 मे 1986 रोजी शिवसेना पक्षाची कोल्हापूरमध्ये स्थापना झाली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिरात देवीचं दर्शन घेतले. त्याच दिवशी कोल्हापूरमधल्या बिंदू चौक इथं बाळासाहेब ठाकरे यांची पहिली सभा झाली. बिंदू चौकात बाळासाहेबांना ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती.

बाळासाहेबांच्या इच्छेखातर महायुतीची पहिली सभा

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर 2014 व 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली युती करण्यात आली. राज्यातील या युतीचा प्रचार शुभारंभही कोल्हापुरातून करण्यात आला होता. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या प्रथेला मान भाजपकडून देण्यात आला होता. त्यांच्या इच्छेखातर महायुतीने करवीर निवासनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन तपोवन मैदान येथे पहिली सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडला होता.

Edited By-Ganesh Thombare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT