Sanjay Raut on Chandrahar Patil After Join Eknath Shinde Shivsena sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanjay Raut on Chandrahar Patil : 'तर पैलवानाला पाच हजारही मतं मिळाली नसती...', शिंदेसेनेत प्रवेश करताच राऊतांनी जागा दाखवली

Chandrahar Patil Join Eknath Shinde Shivsena : मागील काही दिवासांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागली आहे. सांगली जिल्ह्यात जिल्ह्याध्यक्षाने ठाकरे गटाला रामराम ठोकला होता. त्यानंतर आणखी एक मोठा चेहरा एकनाथ शिंदेंसोबत जाणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.

Aslam Shanedivan

Sangli News : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम ठेकला. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. याचीच चर्चा आता राज्यभर होत असतानाच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी चंद्रहार यांच्या प्रवेशावर खरमरीत टीका केली. त्यांनी, 'डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी स्वार्थ आणि आर्थिक लाभासाठी निर्णय घेतला आहे. ते पैलवान दिसत असले तरी ते कच्चं मडकं असल्याची टीका केली आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

लोकसभेला खासदार संजय राऊत यांनी चंद्रहार पाटील यांच्या नावाचा आग्रह सांगलीसाठी धरला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी देखील महाविकास आघाडीला अंगावर घेत चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा सांगलीत येऊन केली होती. उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास दाखवला होता. आता तोच पैलवान शिंदेंचा शिलेदार झाला आहे. यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

अशावेळी मुंबईत पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी चंद्रहार पाटलांचा खरपूस समाचार घेतला. चंद्रहार यांच्या शिंदे यांच्या शिवसेनेतील प्रवेशावर खरमरीत टीका केली. राऊत म्हणाले, ‘‘आम्ही चंद्रहार पाटील यांच्यासाठी सांगली लोकसभा मतदार संघ हा प्रतिष्ठेचा विषय केला. त्यांची लढायची इच्छा होती. शिवसेनेने त्यासाठी ताकद लावली, मात्र आज माझ्यासह पक्षाबरोबर बेईमानी झाली.

स्वार्थासाठी, लाभासाठी चंद्रहार पाटलांना बेईमान व्हावं लागलं? हो याला बेईमानीच म्हणावी लागेल. चंद्रहार पैलवान दिसत असले तरी ते कच्चं मडकं निघाले. त्यांच्यासाठी आर्थिक लाभ महत्त्वाचा आहे. क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्याच्या फक्त ते बाता मारत आहेत. त्यांच्यासाठी आर्थिक लाभ महत्त्वाचा आहे.

त्यांना लोकसभेला त्यांच्याच विट्यातून दहा हजार देखील मते घेता आलेली नाहीत. जी काही 60 हजार मते मिळाली, ती शिवसेनेची होती. ते अपक्ष लढले असते, तर पाच हजारही मते मिळाली नसती, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली आहे.

चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवून देण्यात खासदार राऊत यांचा मोठा वाटा होता. त्यावेळी त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. ही जागा काँग्रेसने मागितली होती. तर यासाठी विद्यमान अपक्ष खासदार विशाल पाटील आग्रही होते. पण राऊत यांच्या आग्रहामुळे ही जागा शिवसेनेनं सोडली नाही. यामुळे राऊत यांच्यावर काँग्रेसने देखील तोफा डागल्या होत्या. पण जंग जंग करून देखील चंद्रहार यांचे त्या निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले. यानंतर आता त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यावरून चंद्रहार पाटील यांच्यावर टीका सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT