Agasti Sahakari Sakhar Karkhana
Agasti Sahakari Sakhar Karkhana Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अकोलेत पिचडांना धक्का : कैलास वाकचौरे राष्ट्रवादीतच

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. या कारखान्यावर माजी मंत्री मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) यांचे वर्चस्व आहे. मात्र त्यांचे विश्वासू समजले जाणारे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते कैलास वाकचौरे यांनी पिचडांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलमध्येच निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. ते उद्या ( मंगळवारी ) मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत. कैलास वाकचौरे यांनी अगस्ती कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. ( Shock to Madhukarrao Pichad in Akole: Kailas Wakchaure will join NCP )

अगस्ती कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन मधुकरराव पिचड यांनी सर्व पक्षीय नेत्यांना केले होते मात्र त्यांच्या या आवाहनाकडे कानाडोळा करत राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी आपापले पॅनल उभे केले आहेत. त्यामुळे अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीत तिरंगी लढत पहायला मिळेल.

कैलास वाकचौरे यांच्या बरोबरच भाजपचा अकोले तालुक्यातील आणखी एक नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असे बोलले जात आहे. या पक्ष प्रवेशाच्या वेळी आमदार किरण लहामटे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सीताराम गायकर, अशोक भांगरे आदी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अकोले नगरपंचायत कैलास वाकचौरे यांनी भाजपचा पंचा गळ्यात घालून भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला होता.

अगस्ती कारखाना निवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. कैलास वाकचौरे यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केल्याने पिचड गटाला धक्का बसला आहे. हा उमेदवारी अर्ज दाखल करताना सीताराम गायकर, अशोक भांगरे, काँग्रेसचे नेते मधुकर नवले, मिनीनाथ पांडे आदी उपस्थित होते. कैलास वाकचौरे हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. उद्या त्यांची राष्ट्रवादीत घर वापसी होणार असल्याचे समजते. आज सकाळी कळस ( ता. अकोले ) येथे कैलास वाकचौरे यांनी ग्रामस्थांच्या सभेत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

दशरथ सावंतांचे शक्ती प्रदर्शन

ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत व निवृत्त सनदी अधिकारी बी.जे. देशमुख यांनी आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. अगस्ती कारखान्याच्या कारभारावर सावंत यांनी वेळोवेळी टीका केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT