shrinivas patil news  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : खासदार श्रीनिवास पाटलांना स्वकियांचाच विरोध का?

Satara NCP Politics : शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या अगोदर गटबाजी समोर आली आहे.

Vishal Patil

Satara Political News : राष्ट्रवादी काँग्रेस फूटीनंतर आता शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळाले आहे. अशा परिस्थितीत शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या अगोदर गटबाजी समोर आली आहे. या गटबाजीत चक्क विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांना डावलले जात असल्याचे दिसून आले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विजय निश्चय मेळाव्यात खासदार पाटील यांना का डावलेले त्यांना स्वकियांचाच विरोध का याबाबत आता चर्चा सुरू असून तर्कवितर्क लढवले जावू लागले आहेत. (Shrinivas Patil) Lok Sabha Election 2024

खासदार श्रीनिवास पाटील यांनी पक्षाच्या सुरूवातीच्या काळात म्हणजे 1999 च्या निवडणुकीत आपल्या नोकरीचा राजीनामा देवून कराड लोकसभा मतदार संघातून राजकीय करिअरला सुरूवात केली. केवळ मित्र असलेल्या शरद पवार यांच्या शब्दाखातर त्यांनी राजकारणात एन्ट्री केली. पहिल्याच निवडणुकीत कराड लोकसभेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांचा जवळपास सव्वा लाखांच्या मतांच्या फरकाने पराभव केला. त्यानंतर 2004 साली पुन्हा राष्ट्रवादीला 2 लाख मतांच्या मताधिक्याने विजय मिळवत बालेकिल्ला मजबूत केला. पुढे कराड आणि सातारा स्वतंत्र असलेल्या मतदार संघाचा एकत्रित सातारा लोकसभा मतदार संघ झाला. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सातारा लोकसभा मतदार संघातून छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanaje Bhosale ) हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) नेतृत्वातच सलग तीनवेळा खासदार झाले. मात्र, 2019 साली अवघ्या चार- सहा महिन्यात उदयनराजेंनी राजीनामा देत भाजपात प्रवेश केला अन् पोटनिवडणूक जाहीर झाली. याठिकाणी लोकसभेला सव्वा लाखांच्या मतांनी विजयी झालेल्या उदयनराजेंना टक्कर देण्यासाठी शरद पवारांनी पुन्हा आपल्या मित्राला हाक दिली. वयोमानानुसार श्रीनिवास पाटील निवडणूक लढवणार नव्हते, परंतु मित्राच्या हाकेसाठी ते मैदानात उतरले आणि त्यांनी उदयनराजेंना तब्बल 87 हजार 717 मतांनी पराभूत केले. विद्यमान खा. श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) यांनी पक्षासाठी ऐवढे करूनही त्यांना स्वकियांकडूनच विरोध का? (Satara NCP Politics)

खा. श्रीनिवास पाटील यांना विरोधची कारणे

सातारा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांना डावलण्याची किंवा विरोधाची काही कारणे सांगितले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने खासदार हे पद मोठे असताना श्रीनिवास पाटील यांच्याकडून आपल्या पक्षातील (शरद पवार गट) इतरांना उघडपणे साथ दिली जात नाही. प्रामुख्याने कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण तालुक्यात खासदार ठोस भूमिका न घेता सर्वपक्षीयांशी संबध ठेवत आहेत. सातारा जिल्हा बँक निवडणूक, कराड बाजार समिती, पाटण बाजार समिती, गावपातळीवरील निवडणुका याठिकाणी ठोस पक्ष म्हणून भूमिका घेतली जात नाही. पाटण बाजार समितीत राष्ट्रवादी विरोध शिवसेना (शिंदे गट) अशी लढत झाली. त्यानंतर कराड बाजार समिती आणि जिल्हा बँक निवडणूकीत आमदार बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांना साथ दिली नाही. अनेक ठिकाणी खासदार लोकसभेची निवडणूक सोडल्यास अलिप्त राहतात, असे सांगितले जात आहे. 

खासदारांची नाळ सर्वपक्षीयांशी

खासदार श्रीनिवास पाटील हे कोणत्याही पक्षांचा व्यक्ती आला तरी त्याला पक्ष, गट- तट न विचारता कामाचं विचारतात. यामुळे पक्ष कोणता असला तरी काम होत असल्याने अनेकजण राजकारण सोडून जोडले गेले आहेत. खासदारांची काम करण्याची शैली अनेकांना आवडत आली आहे. परंतु, राजकारण म्हणून विरोधकांना जवळ करणे निवडणूकीत सहभाग न घेणे याच गोष्टीमुळे विजय निश्चय मेळाव्यात विद्यमान खासदारांना बॅनरवर स्थान नव्हते. तसेच नाराज मंडळींनी आपल्या भाषणातही खासदारांचा नामोल्लेख टाळलेला दिसून आला.

Edited By : Rashmi Mane

SCROLL FOR NEXT