Kolhapur Political News : महाविकास आघाडीच्या बदलत्या भूमिकेमुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून चुरस निर्माण होत आहे. अशातच संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य पक्षातूनच निवडणुकीला सामोरे जाण्याची ठाम भूमिका महाविकास आघाडीला कळवल्यानंतर उमेदवारी बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे नाव समोर आल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती हे संपर्क क्षेत्राच्याबाहेर आहेत. मात्र, 'सरकारनामा'च्या हाती आलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापूरच्या मैदानातच शड्डू ठोकणार आहेत. काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्यांशी काल फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आहे. 11 फेब्रुवारी ते कोल्हापुरात आल्यानंतर नेमकी भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीकडून सरप्राइज उमेदवार असल्याची घोषणा काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांचे नाव समोर आले होते. हाच धागा पकडत संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील खासगीमध्ये काँग्रेसकडून आपण अनुकूल असल्याचे अनेक ठिकाणी बोलून दाखवले होते.
महाविकास आघाडी पुरस्कृत स्वराज्य पक्षाला उमेदवारी द्यावी, असा प्रस्ताव संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडी पुढे ठेवला असल्याचे सांगितले जाते. मात्र, महाविकास आघाडीकडून त्यांना तीन घटक पक्षापैकी एका घटक पक्षात प्रवेश करून उमेदवारी घ्यावी, असा प्रस्ताव आल्याचे समोर आले होते.
त्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य पक्षातूनच निवडणुकीत लढवण्याचा निर्धार करून महाविकासचा प्रस्ताव धुडकावून लावला होता. संभाजीराजे छत्रपती यांच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीने तत्काळ बैठक घेत श्रीमंत शाहू महाराज यांच्या उमेदवारीची चाचपणी केली.
माध्यमात बातम्या आल्यानंतर संभाजीराजे छत्रपती गेल्या पाच दिवसांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत.महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज यांच्या उमेदवारीबाबत लोकसभा मतदारसंघात आढावा घेण्याचे काम सुरू आहे.
संभाजीराजे छत्रपती यांच्याशी 'सरकारनामा'ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांचे एकमत झाले आहे. महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
काल काँग्रेसच्या केंद्रीय पातळीवरून एका वरिष्ठ नेत्याचा संभाजीराजे छत्रपती यांच्याशी संपर्क झाला आहे. या वेळी काँग्रेसने त्यांच्या भूमिकेवर सकारात्मक भूमिका दर्शवल्याचे माहिती सूत्राकडून मिळाली आहे. दोन फेब्रुवारीपासून संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संपर्क दौरे करणार होते. मात्र, त्यांनी अचानक दौरे रद्द करून अज्ञातस्थळी निघून गेले आहेत.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.