Karad News : साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे खासदार शरद पवार गटाचे उमेदवार कोण ? याबाबत अनेक नावे चर्चेत आहेत. मात्र, खासदार पाटील यांनीच सातारा लोकसभेची उमेदवारी घ्यावी, यासाठी शनिवारी त्यांना मानणाऱ्या सातारा जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यांच्या कऱ्हाडमधील कार्यालयात भेटून त्यांना आग्रह केला. अनेकांनी फोनवरुनही खासदार पाटील यांना आग्रह करुन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, खासदार पाटील यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही.
सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार शरदचंद्र पवार गटाची बैठक शुक्रवारी साताऱ्यात झाली. त्यामध्ये स्वतः खासदार पवार यांनी जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय त्या-त्या तालुक्यातील नेत्यांची मते जाणून घेतली. (Shriniwas Patil News)
त्याचबरोबर इंडिया आघाडीतील इतर पक्षांच्या जिल्ह्यातील नेत्यांचीही त्यांनी चर्चा केली. त्यामध्ये खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीचे कारण पुढे करत लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला लढत देण्यासाठी तुल्यबळ उमेदवार खासदार पवार यांच्या गटाकडे नसल्याने खासदार पवार यांनी साताऱ्याच्या उमेदवारीचा निर्णय राखुन ठेवला.
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी पाच उमेदवार जाहीर केले. त्यात साताऱ्याचा उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात त्याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल. मात्र, खासदार पाटील यांनी असा का निर्णय घेतला. याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, खासदार पाटील यांनीच सातारा लोकसभेची उमेदवारी घ्यावी, यासाठी त्यांना मानणाऱ्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयात भेटून त्यांना उमेदवारीसाठी आग्रह केला. या वेळी संबंधित कार्यकर्त्यांनी यावेळची निवडणूक महत्वाची असून तुम्हीच उमेदवारी घ्यावी, अशीही मागणी करत थेट खासदार पवार यांना भेटणार असल्याचे सांगितले. तर अनेकांनी फोनवरुनही खासदार पाटील यांना आग्रह करुन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.
खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांनी सातारा लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे खासदार शरद पवार (Sharad Pawr) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतच जाहीर केले. मात्र, त्यांचा हा निर्णय त्यांना मानणाऱ्या जिल्ह्यातील कार्यकर्त्याना पटलेला नाही. शनिवारी अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारी घ्यावी, अशी मनधरणी केली. मात्र, खासदार पाटील यांनी त्याबाबत कोणीतीही उघड भूमिका जाहीर केली नाही. उमेदवारीच्या निर्णयाबाबत खासदार पाटील यांनी सध्यातरी मौनच बाळगले आहे.