धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे सीना नदीत २ लाख क्युसेकपेक्षा जास्त पाणी वाहत असून ५० हजार क्युसेक वहनक्षमतेपेक्षा चारपट पाणी असल्याने ११० गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
आतापर्यंत १८५ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून ९ बचाव पथके, ११ बोटी व NDRFच्या टीम्स रात्रंदिवस शोध व बचाव कार्य करत आहेत.
माढा, मोहोळ, बार्शी तालुक्यात शेकडो नागरिकांची यशस्वी सुटका झाली असून दारफळ येथे अडकलेल्या नागरिकांना एअरलिफ्ट करण्यासाठी आर्मी हेलिकॉप्टर बोलावण्यात आले आहे.
Solapur, 23 September : गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे तसेच सीना कोळेगावसह तीन धरणांतून तसेच भोगावती नदीतून येत असलेल्या पाण्यामुळे सीना नदीने रौद्र रुप धारण केले आहे. सीना नदीची वहनक्षमता 50 हजार क्युसेकची असताना सध्या नदीतून सुमारे दोन लाख क्युसेक पाणी वाहत आहे, त्यामुळे पाणी नदीपात्राबाहेरून वाहत आहे. सीना नदीचे पाणी काठावरील 110 गावांत शिरले असून आतापर्यंत 185 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
धाराशिव (Dharashiv) आणि सोलापूर जिल्ह्यातील सीना पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला महापूर आला आहे. सीना कोळेगाव धरणातून 72 हजार, चांदणीतून 39 हजार 771, खासापुरी धरणातून 35 हजार 839 क्युसेक, तर भोगावती नदीतून 52 हजार असा एकूण 2 लाख क्युसेकचा विसर्ग सीना नदीपात्रात होत आहे. वास्तविक सीना नदीची वहनक्षमता ही पन्नास हजार क्युसेकची आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांत मोठ्या प्रमाणात शिरले आहे.
पूर परिस्थितीमध्ये शोध व बचाव कार्यासाठी प्रशासनाकडून एकूण 9 टीम कार्यरत करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी सोलापूरच्या (Solapur) 5 टीम, कोल्हापूरच्या 2 टीम (त्यापैकी एक कार्यरत आहे एक मदत कार्यासाठी पोचत आहे) व NDRF ची देखील दोन टीमपैकी एक कार्यरत आहे व दुसरी टीम पोहोचत आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी इतर जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून अकरा बोटी पुरेशा मनुष्यबळासह उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये कोल्हापूरमधून 3, लातूरमूधन 1, सांगलीतून 3, इंदापूरमधून 2, नांदेडमधून 2 अशा 11 बोटी मागवण्यात आलेल्या आहेत.
जिल्ह्यातील शोध व बचाव पथक तसेच आपदा मित्र आणि बार्शी नगरपालिका अग्निशमन विभाग यांनी 21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या कालावधीत 185 नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुटका केलेली आहे. जिल्हा आणि तालुका प्रशासन महापुराची परिस्थिती हाताळण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. नागरिकांनी मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 0217-2731012 या क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
माढ्यातील बचाव कार्य
माढा तालुक्यातील म्हैसगाव येथील सरवदे वस्ती या ठिकाणच्या बाधित 18 लोकांना व एका पाळीव प्राण्याला रेस्क्यू टीमने सुरक्षित बाहेर काढले. पापनस (ता. माढा) येथील 39 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. रिधोरी (ता. माढा) गावातील पुरात अडकलेल्या 8 लोकांनाही सुखरूप बाहेर काढले व इतर 28 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. शिंगेवाडी (ता. माढा) येथील सीना नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेले शिंदे वस्तीवरील नऊ व्यक्तींना बोटीच्या सहाय्याने सुरक्षितपणे बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविले आहे.
मोहोळ, बार्शीत पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका
मोहोळ तालुक्यातील आष्टे येथे सीना नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या एकूण बारा नागरिकांपैकी ३ महिला व ५ लहान मुले अशा ८ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. बार्शी तालुक्यातील इर्लेवाडीच्या यशवंत नगर वस्तीमध्ये भोगावती नदीचे पाणी आले आहे, त्यामुळे वस्तीवरील कुटुंबाची राहण्याची व्यवस्था कुटुंबाचे नातेवाईक, बिरोबा मंदिर व जिल्हा परिषद शाळांमध्ये करण्यात आला आहे. या कुटुंबाची जेवणाची व्यवस्था ग्रामस्थांमार्फत करण्यात आली आहे
तांदूळवाडी, देगावमध्ये बचावकार्य
तांदुळवाडी येथे सीना नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या 27 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. देगाव येथे पुराच्या पाण्यात अडकलेले आतकरे कुटुंबास सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यांना देगावच्या जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे.
माढ्यातील दारफळमध्ये आर्मीला बोलावले
माढा तालुक्यातील दारफळ येथे पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकले असून एनडीआरएफ टीमचे पथक बचावासाठी गेले होते. पण, पुराच्या पाण्याचा प्रवाह खूप वेगाने येत असल्याने अडकलेल्या त्या नागरिकांना सुखरूपणे बाहेर काढणे शक्य झाले नाही, त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्या नागरिकांना एअरलिफ्टद्वारे बाहेर काढण्यासाठी सैन्य दलाशी चर्चा केली आहे. आर्मीचे हेलिकॉप्टर पथक लवकरच दारफळ येथे पोहोचून सर्व नागरिकांना बाहेर काढण्याची कार्यवाही करतील.
प्र: सीना नदीत सध्या किती पाणी वाहत आहे?
उ: सुमारे २ लाख क्युसेक पाणी, जे वहनक्षमतेपेक्षा चारपट आहे.
प्र: आतापर्यंत किती लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे?
उ: १८५ नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.
प्र: बचाव कार्यासाठी किती टीम्स तैनात आहेत?
उ: ९ टीम्स आणि ११ बोटी तसेच NDRFच्या २ टीम्स कार्यरत आहेत.
प्र: दारफळ येथील अडकलेल्या नागरिकांसाठी कोणती उपाययोजना केली आहे?
उ: आर्मीचे हेलिकॉप्टर वापरून नागरिकांना एअरलिफ्ट करण्याची कार्यवाही सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.