Ram Shinde
Ram Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

... तर मग भुजबळ, वडेट्टीवार सरकारमध्ये बसून करतात तरी काय?

अमित आवारी

अहमदनगर - राज्यातील इम्पेरिकल डाटावर राज्यातील मंत्री असलेल्या छगन भुजबळ व विजय वडेट्टीवार यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. हाच धागा पकडत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी राज्यातील इम्पेरिकल डाटावरून दोन्ही मंत्री व महाविकास आघाडीवर टीका केली. ( ... So what if Bhujbal and Vadettiwar sit in the government? )

राम शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हंटले आहे की, 'राज्य सरकारकडून तयार केल्या जात असलेल्या ओबीसी समाजाच्या इम्पिरिकल डेटामध्ये चुका आहेत हे उशीरा का होईना कबूल करणाऱ्या छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मंत्रीपदाचे वजन वापरून हा डेटा अचूक होण्यासाठी आता तरी प्रयत्न करावेत. नाहीतर तुमचे मंत्रीपद बिनकामाचे आहे हेच सिद्ध होईल. अशा पद्धतीने डेटा सादर झाला तर सर्वोच्च न्यायालयात तो डेटा मान्य करणार नाही. तसे झाले तर विना आरक्षणाच्या निवडणुका होण्याची भीती निर्माण झाली आहे,' मत राम शिंदे यांनी व्यक्ते केले.

त्यांनी पुढे म्हंटले आहे की, 'ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबतीत गेल्या तीन वर्षांपासून हे सरकार निव्वळ टाईमपास करीत आहे. राज्य सरकारमधील मंत्री विजय वडट्टीवार आणि छगन भुजबळ यांनी इम्पेरिकल डेटा चुकीच्या पद्धतीने तयार केला जातो आहे अशी कबुली नुकतीच दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे बरोबरच आहे, असेही भुजबळ, वडेट्टीवार म्हणत आहेत. असे असेल तर हे मंत्री सरकारमध्ये बसून करतात तरी काय असा प्रश्न निर्माण होतो. भुजबळ, वडेट्टीवार यांच्यासारखे नेते सरकारमध्ये असूनही इम्पिरिकल डेटामध्ये अशा चुका होत असतील तर या नेत्यांचा ओबीसी समाजाला काहीच उपयोग नाही,' अशी टीका त्यांनी केली.

'मागासवर्गीय आयोग तुमच्या सरकारच्या अधिकारात काम करत आहे, मग एवढ्या मोठ्या चुका कशा होतात? याचा अर्थ सरकारच्या सांगण्यावरूनच या चुका होत आहेत. आयोगाला राज्यात दौरे करायला सांगण्याची गरज नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने ज्या दिवशी आदेश दिला, त्याच दिवशी इम्पिरिकल डेटा तयार करण्याचे काम सुरू व्हायला पाहिजे होते. ते तर झालेच नाही पण आता आडनावावरून डेटा तयार केला जात आहे. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे,' असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT