Nana Patole-Sushilkumar Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Congress : सोलापूर काँग्रेसला विधानसभेला तरी ‘कॅप्टन’ मिळणार का? जिल्हाध्यक्षपद 7 महिन्यांपासून रिक्त

Assembly Election 2024 : काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिलेला इशारा वरिष्ठ नेते किती मनावर घेतात, यावर जिल्हाध्यक्षपद निवडीची सर्व सूत्रे अवलंबून आहेत.

Vijaykumar Dudhale

Solapur, 07 September : काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील हे गेली सात महिन्यांपासून पक्षापासून लांब आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा कार्याध्यक्षाची नेमणूक करून काम चालविण्यात आले. त्यानंतरही पक्षाने जिल्हाध्यक्षांची नेमणूक केलेली नाही.

आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा जिल्हाध्यक्षपदाचा विषय चर्चेत आला आहे, तोही माजी जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांनी पक्षाच्या विभागीय बैठकीत मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे आता तरी सोलापूर काँग्रेसला जिल्हाध्यक्ष मिळेल का? असा सवाल चर्चिला जात आहे.

काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक नुकतीच पुण्यात पार पडली. त्या बैठकीत बोलताना काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हाध्यक्ष नेमणुकीचा निर्णय घ्या, अन्यथा निवडणुकीत पक्षाची अडचण होईल, असा इशाराही पाटील यांनी पक्षाचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde), पृथ्वीराज चव्हाण, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासमाेरच दिला आहे.

काँग्रेसचे माजी सोलापूर (Solapur) जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिलेला इशारा वरिष्ठ नेते किती मनावर घेतात, यावर जिल्हाध्यक्षपद निवडीची सर्व सूत्रे अवलंबून आहेत. लोकसभेसारखी मोठी निवडणूक जिल्हाध्यक्षांविना पार पडली. मग, विधानसभा निवडणुकीत तरी पक्ष कॅप्टनची नियुक्ती करणार की नाही, हा खरा सवाल आहे.

काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर गंभीर गुन्ह्याची नोंद झाली आहे. तेव्हापासून मोहिते पाटील हे सक्रीय पक्षाच्या कार्यक्रमापासून लांब आहेत. मध्यंतरी लोकसभा निवडणुकीत त्यांनी माढा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतरही पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे ऐकिवात नाही.

खरं तर सोलापूर जिल्हाध्यक्षपदाचा प्रश्न तातडीने निकाली निघाला असता मात्र प्रदेश काँग्रेस आणि सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे. त्यातूनच सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदाचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. गेली सात ते आठ महिन्यांपासून काँग्रेसला सक्रीय जिल्हाध्यक्ष मिळालेला नाही.

आगामी विधानसभा निवडणुकीत पुढाकार घेऊन लढणाऱ्या ‘कॅप्टन’ची सोलापूर काँग्रेसला सध्या गरज आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी प्रचाराचे नियोजन करणारे सर्व समावेशक नेतृत्व सोलापूर काँग्रेसला मिळेल का आणि ते नेतृत्व काणे असेल, याची उत्सुकता सोलापूरच्या राजकीय वर्तुळात लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT