Solapur Dcc Bank Election  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur DCC Bank : 'सोलापूर जिल्हा बँकेत मराठा नेत्यांच्या मुलांचे ओबीसी जागांवर अर्ज', रमेश बारस्कर यांचा आरोप

OBC Maratha : ओबीसींच्या जागेवरही अर्ज भरून ओबीसीची जागा गिळंकृत करण्याचं काम प्रस्थापित व्यवस्थेने केलंय, असे रमेश बारस्कर म्हणाले.

सरकारनामा ब्यूरो

Solapur News : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ओबीसींच्या जागांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत प्रस्थापित मराठा नेत्यांच्या मुलांनी ओबीसींच्या जागेवर अर्ज भरून ओबीसींची जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला आहे, असा गंभीर आरोप केलाय शिवसेनेच्या रमेश बारस्कर यांनी केला आहे. माळी समाजाच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी हा आरोप केला,

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागली असून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत ओबीसींसाठी राखीव असलेल्या जागांवर प्रस्थापित मराठा समाजाच्या नेत्यांच्या मुलांनी उमेदवारी अर्ज भरल्याचा आरोप रमेश बारस्कर यांनी केला.

माजी आमदार राजन पाटील यांच्या मुलाने, माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या कुटुंबातील सदस्याने आणि माजी आमदार दिलीप माने यांच्यासह अनेक प्रस्थापित मराठा समाजाच्या मुलांनी अर्ज भरल्याचे बारस्कर यांनी सांगितले. ओपनच्या जागेवर तर त्यांनी अर्ज भरलाच आहे, पण ओबीसीच्या जागेवरही अर्ज भरून ओबीसीची जागा गिळंकृत करण्याचं काम प्रस्थापित व्यवस्थेने केलंय, असे ते म्हणाले.

यावेळी बारस्कर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एससी, एसटीला आरक्षण मिळालं, त्यानंतर 45 वर्षांनी ओबीसीला आरक्षण मिळालं. आता कुठेतरी ओबीसींना त्याचा लाभ मिळू लागलाय, असे असताना ओबीसी आरक्षणामध्ये खोटे दाखले काढले जात आहेत.

सामाजिक मागासलेपणामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 340 व्या कलमात आरक्षणाची तरतूद केली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापणार

कुणबी दाखल्यांची फेरतपासणी करून खरे लाभार्थीच आरक्षणात राहतील आणि बोगस दाखले रद्द होतील, अशी मागणी मेळाव्यात करण्यात आली. बारस्कर यांच्या या आरोपांमुळे सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच तापण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT