Solapur Air Service  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Air Service : मुख्यमंत्र्यांच्या दणक्यानंतर जमिनीवरील स्टार एअरलाईन्सचे अखेर ‘उड्डाण’: सोलापूर-मुंबई विमानसेवेला पुन्हा सुरुवात

Chief Minister Devendra Fadnavis Order: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर स्टार एअरलाईन्स २ ऑगस्टपासून सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू करणार आहे. विमानसेवा बंद केल्याप्रकरणी सरकारने कठोर भूमिका घेतली होती.

Vijaykumar Dudhale

Solapur, 16 July : मोठा गाजावाजा करत सोलापूर-गोवा आणि सोलापूर-मुंबई विमानसेवा स्टार एअरलाईन्स आणि फ्लाय 91या विमान कंपन्यांनी व्हिजिब्लिटीचे कारण देऊन बंद केली होती. त्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले होते. मुंबईतील बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेत दोन्ही कंपन्यांना नोटिसा पाठविण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या कडक भूमिकेनंतर स्टार एअरलाईन्स ताळ्यावर आली असून येत्या २ ऑगस्टपासून सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा सुरु होत आहे.

नाईट लॅंडिंग आणि दृश्यमानतेचे कारण सांगून स्टार एअरलाईन्स आणि फ्लाय-९१ या दोन्ही कंपन्यांनी सोलापूरची विमानसेवा बंद ठेवली होती. स्टार एअरलाईन्सने २८ जूनपासून सोलापूर-मुंबई विमानसेवा बंद केली हेाती. त्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळ उमटले होते. तसेच व्यापारी, उद्योजक, रुग्ण तसेच नोकरदारांची गैरसोय झाली होत होती, त्यामुळे सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी होत होती.

त्या दृष्टीने सोलापूरच्या लोकप्रतिनिधींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक झाली होती. त्या बैठकीत फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत दोन्ही विमान कंपन्यांना नोटीस पाठवा, असे आदेश दिले होते. त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्टार एअरलाइन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. सोलापूर ते मुंबई विमानसेवा तत्काळ सुरू करण्याबाबतचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश कळविण्यात आले. गोरे यांनी दिल्ली येथे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडेही याबाबत पाठपुरावा केला.

मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका आणि पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे स्टार एअरलाईन ताळ्यावर आली असून कंपनीने २ ऑगस्टपासून सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने २ ऑगस्टपासूनच्या सोलापूर-मुंबई प्रवासासाठी बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्र्यांचे आभार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांच्या अडचणीची दखल घेऊन विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी तत्परतेने पावले उचलली. त्यांच्या या पाठबळामुळे सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू होत आहे. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून मी त्यांचे आभार मानतो, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

वास्तविक सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी सरकारने विमान कंपन्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. विमान प्रवाशांची संख्या पूर्ण न झाल्यास रिकाम्या आसनाचे काही दिवस सरकार संबंधित विमान कंपनीला पैसे देत होते. मात्र, काही दिवसांनंतर सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-गोवा ही विमानसेवा नाईट लॅंडिंग आणि दृश्यमानतेचे कारण देऊन बंद केली होती. पण सोलापूर मुंबईची सेवा सुरळीत झाली आहे.

स्टार एअरलान्सने सोलापूर-मुंबई ही विमानसेवा सुरू केली आहे. मात्र फ्लाय ९१ या कंपनीकडून सोलापूर-गोवा या विमानसेवेबाबत अजून कोणतीही सूचना आलेली नाही.

असे असेल आगमन आणि प्रस्थान

आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे चार दिवस ही सोलापूर-मुंबई विमान सेवा सुरू राहणार आहे. यामध्ये सोमवार आणि बुधवारी सोलापुरात आगमन सायंकाळी ५.१० वाजता आणि प्रस्थान सायंकाळी ५.४० वाजता होणार आहे. शुक्रवार आणि रविवारी आगमन दुपारी १.३० वाजता आणि प्रस्थान दुपारी २ वाजता होणार आहे. विमान आगमन व प्रस्थान कालावधी हा २ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे, त्यानंतर वेळेत पुन्हा बदल होणार आहे, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT