Mangalwedha Nagar parishad Election 2025: Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics News: रोजंदारी करणाऱ्या आईच्या अंगावर विजयाचा गुलाल: मित्रांच्या मदतीने दोन्ही लेकरांनी जिंकवलं

Mangalwedha Nagar parishad Election 2025: पैसे तुझ्या सोयीनं दे, पराभव झाला तर पैसे मागणार नाही, असा विश्वास त्या मित्राने दिला. यातून अन्य मित्रांच्या मदतीने प्रचााराची रणनीती ठरली. प्रभाग दोन मध्ये असलेली गोवे आणि सावजी आडनाव असलेली सर्व मंडळी एकवटली.

सरकारनामा ब्यूरो

हुकूम मुलानी

मंगळवेढा (सोलापूर): खडतर आयुष्याशी दोन हात करीत दोन्ही लेकरांना त्याच्या पायावर उभे केलं... आर्थिक क्षमता नसतानाही ग्रामस्थांच्या पुढाकाऱ्यानं तिनं नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली.

दोन्ही मुलांनी आईच्या विजयासाठी अथक प्रयत्न केले. मित्रांकडून आर्थिक मदत घेत त्यांनी विजयाचा गुलाल शेतमजुर असलेल्या आईच्या अंगावर टाकला. त्यावेळी उपस्थित भावुक झाले होते. ही कहाणी आहे, मंगळवेढा येथील नवनिवार्चित नगरसेविका नागर लहू गोवे यांची.

मंगळवेढा नगरपालिका निवडणूकीत तिर्थक्षेत्र विकास आघाडीकडून उमेदवारी देताना प्रभाग दोन मधून दुसऱ्याच्या शेतात रोजंदारी काम करणाऱ्या नागर गोवे यांच्या नावे पुढे आले. नागर गोवे यांना उमदेवारी देण्याचा निर्णय तिर्थक्षेत्र विकास आघाडीने घेतला. निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर नागर गोवे यांनी आपल्या दोन्ही मुलांसह प्रचार करीत मतदारसंघ पिंजून काढला.

त्यांचे पती लहू गोवे यांचा दामाजी चौकात पान टपरीचा व्यवसाय होता. कालांतराने हा व्यवसाय आर्थिक व आजारपणामुळे बंद झाला. परंतु दोन मुलासाठी नागर गोवे यांनी शेतात मजुरी करून मुलांना त्याच्या आयुष्यात उभा करण्याचा धाडसी निर्णय घेत कष्ट सुरूच ठेवले.

एका मुलाला त्यांनी खेळाच्या साहित्य विक्रीचे दुकान टाकून दिले. तर दुसऱ्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. प्रभाग 2 मध्ये नागर गोवे यांची उमेदवारी आर्थिक क्षमता नसताना त्यांना देण्यात आली. मुलगा प्रविण गोवे याचा दांडगा जनसंपर्क ही जमेची बाजू होती. त्यामध्ये भगीरथ भालके यांनी प्रमुख भूमिका बजावली. सिद्धेश्वर अवताडे यांच्या पुढाकारातून सोबतीला प्रमोद सावंजी या मित्राला सोबत घेतले. मुलाचा जनसंपर्क व आईसाठीची धडपड पाहून त्याच्या 22 मित्रमंडळींनी त्यांना आर्थिक मदत करण्याचे ठरवले. प्रचारासाठी आवश्यक मदत त्यांनी केली.

प्रविण यांचा एक मित्र पुढे आला. त्याने पराभव झाला तरी खचून जायचं नाही' असे सांगत मोठी रक्कम दिली. पैसे तुझ्या सोयीनं दे, पराभव झाला तर पैसे मागणार नाही, असा विश्वास त्या मित्राने दिला. यातून अन्य मित्रांच्या मदतीने प्रचााराची रणनीती ठरली. प्रभाग दोन मध्ये असलेली गोवे आणि सावजी आडनाव असलेली सर्व मंडळी एकवटली. त्यांच्या विजयासाठी झटू लागली. शिवप्रतिष्ठान ग्रुपने त्यांना मदत केली.

मतदाराशी दररोज संपर्क ठेवला काही मित्रांनी मतदारांसाठी चहा पाण्याची व्यवस्था केली. नागर गोवे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यात ते मित्र देखील यशस्वी ठरले. आईच्या कष्टाची आणि मित्रांच्या प्रयत्नांनी सार्थक होत नागर गोवे या प्रभाग दोन मधून 289 मतानी विजयी झाल्या. शेवटी विजयाचा गुलाल अंगावर पडल्यामुळे शहरांमध्ये या अनोख्या विजयाची चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT