Vishal Phate  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

फटेला पोलिसी कारवाईचा दंडुका! 45 लाखांची कार, 3 कोटींच्या घरासह मालमत्तांवर येणार टाच

बार्शीचा हर्षद मेहता अशी ओळख असलेल्या विशाल फटेभोवती (Vishal Phate) पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे.

सरकारनामा ब्युरो

सोलापूर : शेअर बाजाराच्या (Share Market) माध्यमातून जादा पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा घालणारा विशाल फटे (Vishal Phate) हा सध्या पोलीस (Police) कोठडीची हवा खात आहे. बार्शीचा हर्षद मेहता (Harshad Mehta) अशी ओळख असलेल्या फटेभोवती पोलिसांनी कारवाईचा फास आवळण्यास सुरवात केली आहे. फटेच्या मालमत्तांवर टाच आणण्यासाठी आता पोलिसांनी पावले उचली आहेत.

विशाल फटेविरोधात पोलिसांनी आता कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे, महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण अधिनियम 1999 कलम ३ अंतर्गत फटेची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई पोलिसांनी सुरु केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने त्याची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाईल. यामुळे फटेच्या मालमत्तांवर लवकरच टाच येणार हे आता स्पष्ट झाले आहे. याचबरोबर त्याचे मोबाईल आणि लॅपटॉपही जप्त केले जाणार आहेत. (Vishal Phate Case Updates)

विशाल फटे याने गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या पैशांतून मोठी मालमत्ता खरेदी केली आहे. यात त्याच्या 45 लाखांच्या आलिशान मोटारीचाही समावेश आहे. त्याने बार्शीत तीन कोटींचे घर बांधले असून, दुसरीकडे सहा गुंठे जागा घेऊन तिथे तो नवीन घर बांधात होता. त्याच्याकडे 250 ते 300 ग्रॅम सोने आहे. आता फटेची स्थावर मालमत्ता जप्त केली जाणार आहे. पोलिसांकडून याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे पाठविला जाणार असून, त्यांच्या मान्यतेनंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

विशाल फटे (Vishal Phate Scam) याने बार्शीतीलच (Barshi Scam) नव्हे तर राज्यभरातील हजारो लोकांना गंडा घातल्याची चर्चा आहे. फटेविरोधात तक्रारींचा ओघ सुरूच आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढत आहे. या प्रकरणी फिर्यादी दिपक आंबुरे यांच्या फिर्यादीवरुन मुख्य सूत्रधार विशाल फटे याच्यासह पत्नी राधिका फटे, वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे व अलका फटे (सर्वजण रा. कर्मवीर हौसिंग सोसायटी, अलिपूर रोड, बार्शी) यांच्याविरुध्द 14 जानेवारीला गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी त्याचे वडील व भावाला अटक केल्यानंतर तो पोलिसांना शरण आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT