Sushilkumar Shinde  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics: सोलापुरातील आजी-माजी आमदारांना झटका; 'या' नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Anand Surwase

Solapur News: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. शुक्रवारी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तिऱ्हे या गावचे नेते आणि सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक भारत जाधव यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी दक्षिण सोलापूरचे नेते सुरेश हसापुरे, चेतन नरोटे, विनोद भोसले यांच्यासह अन्य काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आजी-माजी आमदारांना झटका

भारत जाधव यांचा उत्तर सोलापूर तालुक्यात दांडगा जनसंपर्क आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने त्यांनी आवाज उठवून न्याय मिळवून दिला. सीना नदीचा पाणीप्रश्न असो, ऊसदराचे आंदोलन असो किंवा मराठा आरक्षण, यासाठी भारत जाधव यांनी सक्रिय सहभाग घेत जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले आहे.

सुरुवातीला काँग्रेसचे आमदार दिलीप माने यांच्या सोबत काम केल्यानंतर मध्यंतरीच्या काळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, मूळची काँग्रेस विचारसरणी असल्याने भारत जाधव यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. भारत जाधव यांचा हा काँग्रेस प्रवेश माजी आमदार दिलीप माने यांच्यासह भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'आधीच्या पक्षात घुसमट..'

उत्तर सोलापूरचे माजी सभापती दिवंगत नेते हरिभाऊ जाधव यांचे सुपुत्र भारत जाधव यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापुरातील जनवात्सल या निवासस्थानी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी मत व्यक्त करताना भारत जाधव म्हणाले की, मागील काही महिन्यांमध्ये भाजपमध्ये काम करत होतो. मात्र, त्या पक्षामध्ये माझी घुसमट होत होती. या काळातही माझा आणि शिंदे साहेबांचा नित्याचा संपर्क होता.

त्यातच शिंदे साहेबांचे काम पाहून मनातून सारखे वाटत होते, आपण पुन्हा काँग्रेससोबत काम केले पाहिजे. त्यामुळे अखेर धाडस करत साहेबांची भेट घेऊन काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतला. यापुढे संपूर्ण उत्तर सोलापूर तालुक्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करून येणाऱ्या काळात तालुक्यात पुन्हा एकदा काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी कार्य करणार असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले.

(Edited By - Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT