Solapur Youth Congress
Solapur Youth Congress Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : पंतप्रधान मोदींना सोलापुरातून पाठवली पाच हजार पत्रे : प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसचा उपक्रम

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या (Congress) वतीने देशभरात पोस्ट कार्ड मोहीम सुरू करण्यात आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने केलेली कारवाई आणि मोदी-आदानी यांच्यातील भ्रष्टाचारासंदर्भातील संबंध, यावर विविध प्रश्न त्या पोस्ट कार्डमध्ये विचारण्यात आले आहेत. सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या माध्यमातून तब्बल पाच हजार पत्र टपाल विभागाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविण्यात आली आहेत. (Solapur Youth Congress sent Five thousand letters to Narendra Modi)

सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने रेल्वे स्थानका जवळील मुख्य पोस्ट कार्यालय येथे काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. ३ एप्रिल) पंतप्रधानांना पोस्ट कार्ड पाठविण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने केलेली कारवाई व मोदी-आदानी यांच्यामधील भ्रष्टाचार, अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला द्यावीत, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

त्या म्हणाल्या की, देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे चालू आहे. राहुल गांधींवरील कारवाई लोकशाहीविरोधी आहे. आम्ही राहुल गांधी यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. आज आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टकार्ड पाठवली आहेत. ती मध्येच गहाळ होऊ देऊ नयेत. पोस्टकार्डमधील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पंतप्रधानांनी जनतेला द्यावे.

या वेळी प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर, अनंत म्हेत्रे, प्रवीण जाधव, ओंकार गायकवाड, विश्वराज चाकोते, महेश लोंढे, सुमित गडगी, प्रवीण वाले, प्रतीक आबुटे, राजासाहेब शेख, शरद गुमटे, अनिल जाधव, युवराज जाधव, विवेक इंगळे, सुनील सारंगी, सुशीलकुमार म्हेत्रे, धीरज खंदारे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT