Ranjitsinh Disale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

डिसलेंनी पुरस्कारासाठी दिली खोटी माहिती? परितेवाडी आदिवासी भाग अन् शाळा गोठ्यात...

ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) हे आता वादात अडकले आहेत.

सरकारनामा ब्युरो

सोलापूर : ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) हे आता वादात अडकले आहेत. डिसले यांनी हा पुरस्कार मिळवण्यासाठी खोटी माहिती दिल्याचा गंभीर आरोप जिल्हा परिषदेच्या (ZP) सर्वसाधारण सभेत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, डिसले नियुक्तीस असलेली परितेवाडी शाळा ज्यांच्या भागात आहे त्याच जिल्हा परिषद सदस्याने हा आरोप केला आहे. डिसलेंनी जिल्हा परिषद आणि गावाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Ranjitsinh Disale News)

डिसले गुरुजींच्या आरोपांमुळे सोलापूर जिल्हा परिषदेची राज्यभरात बदनामी झाली आहे. याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे म्हणाले की, परितेवाडी माझ्याच भागात आहे. डिसले यांनी पुरस्कारासाठी खोटी माहिती दिली होती. परितेवाडी हा आदिवासी भाग आहे, जिल्हा परिषदेची शाळा गोठ्यात भरते, तेथील लोक कन्नड भाषिक आहेत, तेथे 80 टक्के बालविवाह होतात, अशी खोटी माहिती पुरस्कारासाठी देऊन त्यांना गावाची बदनामी केली. याउलट परितेवाडीतील लोक बऱ्यापैकी सधन आहेत. अनेक जण शेतकरी कुटुंबातील असून बांधकाम कामगारही आहेत. डिसलेंनी एवढा मोठा पुरस्कार मिळवला पण त्यांच्या मार्गदर्शनाचा काहीही उपयोग शाळेला झाला नाही.

अनिरुद्ध कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ऑनलाईन सभेत डिसले गुरुजींचा निषेध करण्यात आला. जिल्हा परिषद, शाळा आणि प्रशासनाची बदनामी केल्याप्रकरणी हा निषेध करण्यात आला. अधिकाऱ्यांनी मानसिक त्रास देऊन पैशांची मागणी केल्याचा निराधार आरोप करून डिसले यांनी बदनामी केल्याबद्दल सभेत वसंतनाना देशमुख यांनी हा निषेध केला. प्रशासनाची बाजू ऐकून न घेता शिक्षणमंत्र्यांनी दबाव आणला, अशी भूमिका काही सदस्यांनी घेतली. सभेत नियमाने कामकाज केल्याबद्ददल मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आणि शिक्षणाधिकारी डॉ.किरण लोहार यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला.

डिसले गुरुजी प्रकरणात जिल्हा परिषदेने कठोर भूमिका घेतली आहे. डिसले गुरुजींच्या संदर्भात 2021 मध्ये झालेल्या चौकशीचा अहवाल प्राथमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे पाठविला आहे. हा विषय संवेदनशील असल्याने याची पडताळणी करण्याच्या सूचना स्वामी यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिल्याचे समजते. डिसले गुरुजी यांचा माफीनामा, पाच जणांच्या चौकशी समितीचा अहवाल या बाबी जिल्हा परिषद बारकाईने व काटेकोरपणे हाताळत आहे.

या सर्व प्रकरणात डिसले गुरुजींनी अडचणीत येताच माफीनामा सादर करून या वादावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना डिसले यांनी दोन पानी पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी झालेल्या प्रकाराबाबत माफी मागितली होती. यापुढे थेट प्रसारमाध्यमांसमोर जाणार नाही, अशी कबुलीही डिसले यांनी दिली होती. त्यांनी आता माफीनामा सादर करीत हे प्रकरण थांबवण्याची मागणी केली आहे. डिसले यांच्या माफीनाम्याची जोरदार चर्चा सध्या जिल्हा परिषदेत रंगली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT