Solapur 28 March : सोलापूर जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित विषय समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडी शुक्रवारी (ता. 27 मार्च) पार पडल्या. मात्र, या निवडीवेळी मोठ्या प्रमाणात नाट्यमय घडामोडी, दबावतंत्र आणि मानापमान नाट्य रंगल्याचे दिसून आले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाच विषय समित्यांच्या सभापतिपदाची नावे निश्चित केली होती. मात्र, शेवटच्या पाच मिनिटांत फलटणमार्गे मुंबईतून सूत्रं हलली आणि जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांचे नाव सभापतिपदासाठी पुढे आले.
ऐनवेळी स्पर्धेत आलेल्या केदार सावंतांनी चक्क अर्थ व बांधकामावरच दावा ठोकला. शेवटी त्यांना शिक्षण व आरोग्य दिल्याने रामप्पा चिवडशेट्टींना कृषी व पशुसंवर्धनवर समाधान मानावे लागले. या सर्व घडामोडींमुळे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांची मात्र चिडचिड झाल्याचे दिसून आले.
जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे हे शुक्रवारी सोलापूरमध्ये (Solapur) आले होते. त्यांनी जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन सभापतिपदासाठीची नावे निश्चित केली होती. उपाध्यक्षांकडे पारंपारिक पद्धतीने जाणारे अर्थ व बांधकाम विभागासाठी इंद्रजीत पवार यांना अर्ज भरण्यास सांगितले होते.
समाज कल्याण विभागासाठी संस्कृती सातपुते, महिला-बाल कल्याण समितीसाठी ॲड अमृता वाघे यांना अर्ज भरण्यास सांगितले. मात्र, चेतनसिंह केदार सावंत आणि रामप्पा चिवडशेट्टी यांनीही अर्ज दाखल होते. मात्र या दोघांच्या अर्जावर सभापतिपदाचा कॉलम रिक्त ठेवण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्धारीत वेळेत इतर कोणाचे अर्ज न आल्याने बिनविरोध निवडीची घोषणा केली. मात्र, त्या घोषणेमुळे उपस्थितांना धक्का बसला.
चेतनसिंह केदार सावंत यांचे नाव सभापतिपदासाठी नव्हते. मात्र, ऐनवेळी त्यांची सभापतिपदाच्या शर्यतीत एन्ट्री झाली. त्यासाठी व्हाया फलटणमार्गे मुंबईतून सूत्र हलल्याची चर्चा आहे. ऐनवेळी एन्ट्री झालेल्या केदार सावंत यांनी अर्थ व बांधकाम समितीवर दावा ठोकल्याने पेच निर्माण झाला.
पालकमंत्र्यांनी उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्याकडे अर्थ व बांधकाम, संस्कृती सातपुते यांच्याकडे समाज कल्याण, ॲड अमृता वाघे यांच्याकडे महिला व बालकल्याण, रामप्पा चिवडशेट्टी यांच्याकडे शिक्षण व आरोग्य असे वाटप ठरलं होते. मात्र, केदार सावंतांच्या दाव्यामुळे सारी गणित बदलली गेली.
चिवडशेट्टी व केदार हे ‘अर्थ व बांधकाम’साठी आग्रही होते. मात्र चिवडशेट्टी यांना शिक्षण-आरोग्य समितीचा शब्द दिल्याने त्यांनी माघार घेतली. मात्र, वरिष्ठांच्या चर्चेत केदार यांना चिवडशेट्टींना देण्यात येणारे शिक्षण-आरोग्य सभापतिपद देण्यात आले. त्यामुळे चिवडशेट्टींना कृषी व पशुसंवर्धनवर समाधान मानावे लागले. या बदलेल्या निवडीवर खुद्द चिवडशेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली.
किती शिक्षण झालंय?
सभापती निवडीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रत्येकाला किती शिक्षण झाले, असे विचारले. प्रत्येकाने आपापले शिक्षण सांगितले. शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांना किती शिक्षण झाले आहे, कोणत्या विद्यापीठात झाले आहे, असे एकापेक्षा अनेक प्रश्न विचारले, त्याची चर्चा सभागृहात रंगली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.