Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dr. Sujay Vikhe Patil : काही लोकांना कमी कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचा भास होतोय..

सरकारनामा ब्युरो

Dr. Sujay Vikhe Patil : पारनेर येथील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा काल ( ता. 28 ) झाला. या मेळाव्यात खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी पारनेरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीकेची झोड उठविली.

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, आमच्या कुटुंबाने अनेक वर्षांच्या राजकीय संघर्षात एवढा सत्तेचा माज कधी पाहिला नाही. पारनेर तालुक्यात एवढे काय घडले होते की, त्यामुळे एवढा मोठा बदल झाला. शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केली गेली. गुन्हे दाखल झाले म्हणून राष्ट्रवादीचे तालुक्यातील पदाधिकारी व पारनेर नगरपंचायतचे अध्यक्ष पसार आहेत. ही पारनेर तालुक्याची संस्कृती नव्हती, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, माझे व्यक्तीशः कोणाशी वैर नाही. कुणाला वाटत असेल सुजय विखे कुणाला घाबरतो. त्याला दडपण आले आहे, असे अजिबात नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूलमंत्री होण्याचा मान मिळाला. आगामी एक महिन्यांत एकही अनधिकृत वाळूचा डम्पर पारनेर तालुक्यातून जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

आम्हाला वाळू तस्करी नको आहे. समाजाला धोका असणारे गुंड आम्हाला नको आहेत. खाणीतून आलेले पैसे राजकारणात वापरले जातात, ते आम्हाला नको, असे त्यांनी स्पष्ट केले.

पारनेर तालुक्यात केकचा खप सर्वात जास्त आहे. भारतात एवढा खप कोठेही नाही. याचा सर्वे झाला पाहिजे. याला जो व्यक्ती जबाबदार आहे त्याचा केक कंपन्यांनी येऊन सत्कार केला पाहिजे, असा चिमटाही त्यांनी नाव न घेता काढला.

खोटे गुन्हे दाखल करणे, तहसीलदारांच्या मदतीने डम्पर पकडणे, घरकुल योजनेसाठी टाकलेल्या वाळूचे पंचनामे करणे, असे प्रकार आता पारनेर तालुक्यात बंद होणार आहे. काळ येतो, जातो. लोक मंत्री होतात, जातात. काही लोकांना कमी कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचा भास होत आहे. सत्तांतर झाल्यावर, मंत्री झाल्यावर पहिल्यांदा जे सत्कार करायला येतात. ते लोक कधीही आपले नसतात, असे ही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT