Kolhapur police officers accused of stealing seized gold Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Police Scandal : कोल्हापूर पोलिसांनी चोरीचं सोनं लांबवलं? जप्त दुचाकीही गायब; पोलिस अधिक्षक 'अ‍ॅक्शन'मध्ये; चौकशी सुरू

SP Yogesh Kumar Gupta Kolhapur Police : घरफोड्यांमध्ये चोरट्यांकडून जप्त केलेले सोने तसेच दुचाकी पोलिसांनी लांबवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यावर एसपी योगेश कुमार यांनी कठोर पावले उचलली आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur Crime News Today: कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर पोलिसांनी मोठा गाजावाजा करत सोन्याची मोठी चोरी पकडली असे दीड महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. त्यामुळे पोलिस अधिक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्यासह सर्वच प्रशासकीय पातळीवर या पोलिसांचे कौतुक करण्यात आले होते. मात्र शहापूर पोलिस ठाणे आणि वडगाव पोलिस ठाणे यांच्यातील विविध तक्रारी आणि दोन अधिकाऱ्यांच्या वादामधून या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.

पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल आणि वाहना संदर्भात संभ्रम करणाऱ्या तक्रारी आल्यानंतर जप्त केलेले सोनेच पोलिसांनी लांबवल्याचा संशय निर्माण झाला आहे. याची कुणकुण लागताच एसपी योगेश कुमार गुप्ता यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

शहापूर पोलिसांनी दीड महिन्यापूर्वी उघडकीस आणलेल्या तब्बल नऊ घरफोड्यांच्या गुन्ह्यांबाबत आता संशय निर्माण झाला आहे. सुमारे ४४ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले, अशी माहिती दीड महिन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा पोलिस प्रमुखांनी शहापूर पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांचा आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला होता.

मात्र या कारवाईविरोधात तक्रारी दाखल झाल्याने या संपूर्ण प्रकरणाची अप्पर पोलिस अधीक्षकांकडून चौकशी सुरू झाली आहे. तारदाळ येथील घरफोडीचा तपास करताना शहापूर पोलिस ठाण्याने जयसिंगपूर, सांगली, कुरुंदवाड व वडगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील घरफोड्यांचा छडा लावल्याचे जाहीर केले होते; मात्र, वडगाव पोलिस ठाण्याने आरोपी ताब्यात घेतल्यानंतर सोन्याचा मुद्देमाल शहापूर पोलिसांकडे दिल्याचा दावा करण्यात आला. यावरून वडगाव व शहापूर पोलिसांमध्ये वादावादी होऊन गोंधळ उडाल्याचे समोर आले.

दरम्यान, याच प्रकरणात आरोपीकडून जप्त करण्यात आलेली दुचाकी मुद्देमालात दाखविली नसल्याची गंभीर तक्रार पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली. या तक्रारीमुळे संपूर्ण तपास प्रक्रियेवर संशय बळावला आहे.

त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी चौकशी सुरू केली आहे. जयसिंगपूर व सांगली परिसरातील चोरीचे दागिने पोलिसांना देणाऱ्या सोनारांना बोलावून स्वतंत्र जबाब नोंदविले आहेत.

तसेच शहापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक, गुन्हा शोध पथक आणि सध्या तपास करणारे वडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांचीही सखोल चौकशी करण्यात आली आहे. चौकशी अहवालानंतर कोणती कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.

पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे रेकॉर्डिंग सादर

शहापूर पोलिसांनी ‘जबाबदारी आम्ही घेतो’ असा विश्वास देत जयसिंगपूर, सांगलीतील सोनारांकडून चोरीचे दागिने जप्त केले; मात्र आता वडगाव पोलिसांकडून पुन्हा चौकशी सुरू झाल्याने सोनारांची कोंडी झाली आहे. चौकशीत संबंधित सोनारांनी शहापूर पोलिस ठाण्यातील गुन्हा शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांशी झालेल्या फोनवरील संभाषणांची रेकॉर्डिंग सादर केल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

चौकशी अहवाल सादर करणार

अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी सांगितले की, जप्त केलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा तपशील आणि चौकशीत सोनारांकडून पोलिसांना मिळालेल्या दागिन्यांचा आकडा प्राथमिक चौकशीत जुळताना दिसत आहे.

मात्र, घरफोडी प्रकरणातील दुचाकी मुद्देमालाबाबत अधिक संशय असून त्या अनुषंगाने सखोल चौकशी सुरू आहे. सर्व बाबींची वस्तुनिष्ठ आणि सखोल पडताळणी करून चौकशी अहवाल पोलिस अधीक्षकांकडे सादर करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT