Dhananjay Mahadik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhananjay Mahadik : धनंजय महाडिकांच्या भीमा परिवारात फूट; भीमा कारखाना उपाध्यक्षांचा राजू खरेंना पाठिंंबा

Pandharpur-Mohol Assembly Constituency : पंढरपूर तालुक्यातील भीमा परिवारात उभी फूट पडली आहे. लोकसभेप्रमाणेच भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांना पाठिंबा दिला आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 12 November : पंढरपूर तालुक्यातील भीमा परिवारात उभी फूट पडली आहे. लोकसभेप्रमाणेच भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांना पाठिंबा दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि भीमा परिवाराचे प्रमुख धनंजय महाडिक यांनी दोन दिवसांपूर्वीच महायुतीच्या पंढरपूर आणि मोहोळमधील उमेदवारांना पाठिंबा दिला होता.

खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा पंढरपूर तालुक्यात टाळकी सिकंदर येथे भीमा सहकारी साखर कारखाना आहे. या कारखान्याचे पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यात कार्यक्षेत्र आहे. या भागात महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भीमा परिवार कार्यरत आहे. हा भीमा परिवार विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावू शकतो, त्यामुळे भीमा परिवार कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत दोन दिवसांपूर्वी भीमा परिवाराची बैठक झाली. या बैठकीला मोहोळ (Mohol) आणि पंढरपूर (Pandharpur) विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार यशवंत माने आणि आमदार समाधान आवताडे हे उपस्थित होते. त्या बैठकीत पंढरपूर आणि मोहोळ मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. माने आणि आवताडे यांना निवडून आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

भीमा परिवाराची बैठक होऊन दोन दिवस होत नाहीत तोच भीमा परिवारात उभी फूट पडली आहे. भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

भीमा कारखान्याचे उपाध्यक्ष जगताप यांच्या सोहळे येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, उमेदवार राजू खरे यांच्यात बैठक झाली. या वेळी काखान्याचे संचालक अनिल कदम आणि महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतही सतीश जगताप यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला होता. जगताप यांनी नुसता पाठिंबा दिला नव्हता तर ते प्रत्यक्ष शिंदे यांच्या प्रचारात सहभागी झाले होते, त्यामुळे भीमा परिवाराचे प्रमुख धनंजय महाडिक यांनी दोनच दिवसांपूर्वी महायुतीला पाठिंबा दिलेला असताना कारखान्याच्या उपाध्यक्षांनी मात्र महाविकास आघाडीला आपला पाठिंबा दिला आहे.

महायुतीतही फाटाफूट

दरम्यान, शिवसेनेचे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) जिल्हाप्रमुख चरणराज चौरे यांनी युती धर्माचे पालन करून आमदार यशवंत माने यांच्यासोबत राहणे अपेक्षित असताना त्यांनी विरोधात भूमिका घेतली आहे. चौरे यांनी आपला पाठिंबा महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांनी केला आहे, त्यामुळे महायुतीतही फाटाफूट दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT