Solapur, 12 October : मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीत नुरा कुस्ती आणि खेचाखेची सुरू आहे. एक पार्टी दिवसभर आपल्या नेत्याला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा सांगत असते, तर दुसरी पार्टी आणि काँग्रेसवाले ते दिवसभर नाकारत असतात. निवडणुकीअगोदरच महाआघाडीवाल्यांची ही परिस्थिती आहे, त्यामुळे महाविकास आघाडीवाले महाराष्ट्राला कदापि स्थिर सरकार देऊ शकत नाहीत, असा घाणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची आज सोलापूर शहरात सभा झाली. त्या सभेत बोलताना मोदी यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने देशात साठ वर्षे राज्य केले. पण, त्यांची विचारसरणी ही समस्या निर्माण करायच्या आणि लोकांना त्या समस्यांमध्ये अडकवून ठेवणे, हीच काँग्रेसचे धोरण राहिलेले आहे.
महाराष्ट्राला (Maharashtra) आगामी पाच वर्षांसाठी स्थिर सरकारची गरज आहे, तर दूरगामी धोरण आखली जातील. महाविकास आघाडीवाले ज्या गाडीतून पुढे जात आहेत, त्या गाडीला ना चाके आहेत ना ब्रेक आहे. ती गाडी कोण चालवणार, यावरून त्यांच्यात मारामारी सुरू आहे. महाविकास आघाडीची गाडी सर्वांत अस्थिर गाडी आहे. हे लोक आपापसांत भांडणातच सर्वाधिक वेळ घालवत आहेत, असा आरोपही नरेंद्र मोदी यांनी केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, काही प्रकल्प कित्येक दशकांपासून लटकले होते, ते महायुती सरकारने पूर्ण केले आहेत. विकसित महाराष्ट्रामुळे आम्ही विकसित भारताकडे वाटचाल करत आहोत. महायुती आहे; म्हणून गती आहे आणि महाराष्ट्राची प्रगती आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षाने पाण्यासाठी सर्वाधिक काळ त्रासवले आहे. आमच्या प्रयत्नांमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांचा जलस्तर उंचावला आहे. आमच्या सरकारने वीजबिल माफ केले आहे. शेतकऱ्यांना बिल भरायला लागू नये, यासाठी शेतकऱ्यांना सोलर यंत्रणा देण्याची योजना आम्ही सुरू केली आहे, त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.