Babaraje Deshmukh-Fattesinh Mane Deshmukh Join BJP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mohite Patil : मोहिते पाटलांच्या घरात उभी फूट; विजयदादांच्या मावस अन्‌ चुलत भावांसह मातब्बरांचा भाजपत प्रवेश

Babaraje Deshmukh-Fattesinh Mane Deshmukh Join BJP : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली मोहिते पाटील कुटुंबातील समर्थकांना पक्षात घेत मोठा राजकीय धक्का दिला आहे.

सुनील राऊत
  1. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोहिते पाटील कुटुंबातील अनेक मातब्बर नेत्यांना पक्षात घेऊन मोठा राजकीय धक्का दिला आहे.

  2. जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बाबाराजे देशमुख, माने पाटील व देशमुख कुटुंबातील अनेक सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

  3. या पक्षांतरामुळे माळशिरस तालुक्यासह आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

Solapur, 27 December : महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत भारतीय जनता पक्षाने अकलूजच्या मोहिते पाटील यांना मोठा धक्का दिला आहे. भाजपचे संकटमोचक तथा जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी थेट मोहिते पाटील कुटुंबांवर घाव घातला आहे. मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक बाबाराजे देशमुख यांना भाजपत प्रवेश देतानाच त्यांच्या कुटुंबांत उभी फूट पाडली आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे मावस, चुलत भावांसोबत भावकीतील मातब्बरांना भाजपच्या झेंड्याखाली आणले आहे.

मोहिते पाटील परिवारातील रक्ताच्या नात्यातील लोकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. नगरपालिका निवडणुकीनंतर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही भाजपने मोहिते पाटील यांना वगळून निवडणुका लढविण्याचे ठरविले असल्याचे दिसून येत आहे.

जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नातेपुते येथे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्यासह त्यांचा संपूर्ण परिवार, माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपत प्रवेश केला.

यासोबतच माजी उपमुख्यमंत्री विजयदादांचे मावस भाऊ तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, चुलत बंधू हिंदुराव माने पाटील, सुजय माने पाटील, यांच्यासोबत माजी आमदार बाबूराव देशमुख यांचे चिरंजीव पांडुरंगभाऊ देशमुख, धनंजय देशमुख व वेळापूर, अकलूज परिसरातील माने पाटील, देशमुख कुटुंबीयांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

बाबाराजे देशमुख परिवारातील धनाजी, मालोजीराजे, अभयसिंह, रत्नसिंह, रणवीर, विश्वजीत, किर्तीबाबा, मानसिंग या चौथ्या पिढीतील युवकांनी या सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन केले होते. आजच्या पक्षांतरामुळे भावी काळात माळशिरस तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या अकलूज नगरपालिका निवडणूक भाजपने माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर लढवली होती. त्यात भाजपचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच, नगराध्यक्षदाच्या उमेदवारालाही चांगली मते मिळालेली आहेत, त्यामुळे भाजपचा विशेषतः माजी आमदार सातपुते यांचा विश्वास मोठ्या प्रमाणात दुणावला आहे. त्यातूनच सातपुते यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीकोनातून रणनीती आखायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

Q1. भाजपने मोहिते पाटील कुटुंबाला कसा धक्का दिला?
मोहिते पाटील कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील अनेक प्रमुख व्यक्तींना भाजपमध्ये प्रवेश देऊन धक्का दिला.

Q2. कोणाच्या उपस्थितीत हा भाजप प्रवेश झाला?
जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नातेपुते येथे हा प्रवेश झाला.

Q3. या पक्षांतराचा परिणाम कुठल्या निवडणुकांवर होऊ शकतो?
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Q4. अकलूज नगरपालिका निवडणुकीत भाजपची कामगिरी कशी राहिली?
भाजपने स्वबळावर निवडणूक लढवून चार नगरसेवक निवडून आणले आणि आत्मविश्वास वाढवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT