Shrikant Shinde
Shrikant Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Vs Pichad : श्रीकांत शिंदे म्हणाले, शरद पवारांवर टीका म्हणजे पिचडांचा सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न

सरकारनामा ब्युरो

NCP Vs Pichad : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) यांनी दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या वर नाव न घेता टीका केली होती. तसेच आदिवासी असल्यामुळेच राष्ट्रपती मुर्मू व मला सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप केला होता. या आरोपाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

श्रीकांत शिंदे म्हणाले, भाजपचे नेते मधुकरराव पिचड यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली. त्यांनी त्या कार्यक्रमात बोलून दाखविले की, मी आदिवासी असल्यामुळे मला सन्मानाची वागणूक दिली गेली नाही. मला अपमानीत करण्यात आले. अशा बऱ्याच वल्गना त्यांनी केल्या. हे मधुकरराव पिचड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना पश्चिम महाराष्ट्रातील आदिवासी महादेव कोळी समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान पिचडांनीच केले, असा आरोप त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, हे पिचड जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी वरिष्ठ नेत्यांना खोट्या गोष्टी सांगितल्या. पिचड यांचा महादेव कोळी जातीचा दाखला बोगस आहे. ते महादेव कोळी नसून आदिवासी कोळी आहेत. त्यांनी जे काही राजकीय फायदे घेतले ते महादेव कोळी जातीच्या जोरावर घेतले. सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, उस्मानाबाद, लातूर या भागात महादेव कोळी समाज नाही, असे त्यांनी आदिवासी मंत्री असताना वरिष्ठांना वारंवार दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील महादेव कोळी समाजावर मोठा अन्याय केला. हे पिचड भाजपमध्ये गेल्यावर शरद पवार व अजित पवारांचा स्वाभिमान काढतात. या पिचडांना पश्चिम महाराष्ट्रातील आदिवासी जनता चांगली ओळखून आहे, असा त्यांनी सांगितले.

पिचड हे बोगस आदिवासी असून ते आदिवासींना मिळणाऱ्या सेवा, सुविधांचा लाभ घेत आहेत. समृद्धी महामार्गातील भूसंपादनात पिचड उघडे पडले. स्वतःला वाचविण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या वॉशिंग मशिनमध्ये गेल्यावर स्वच्छ झाले. मधुकरराव पिचडांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवरील चिखलफेक थांबवावी. ते पश्चिम महाराष्ट्रात फिरत नाहीत. कारण महादेव कोळी समाजाला माहिती आहे की, या समाजाचा वैरी कोणता पक्ष नसून मधुकरराव पिचड नावाचा व्यक्ती आहे. त्यांनी आदिवासी मंत्री असताना आदिवासी कोळी समाजावर जुलमी अटी लादल्या. अन्याय केला. तेच पिचड आता भाजपमध्ये गेल्यावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला आदिवासी विरोधी दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

पिचडांना लायकी नसताना शरद पवार यांनी वरदहस्त देऊन मोठ्या संधी दिल्या. मंत्रिपद दिले. तेच पिचड आता शरद पवार व अजित पवार यांच्यावर टीका करतात. ते आदिवासी, शरद पवार व अजित पवार यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

महाविकास आघाडी असताना आमचे आदिवासींचे शिष्टमंडळ तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटले. त्यांनी महादेव कोळी समाजाच्या शिष्टमंडळाची महसूल, आदिवासी विभागांच्या अधिकाऱ्यांशी बैठक लावून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. अजित दादांनी महादेव कोळी समाजाचे प्रश्न सोडविण्याची भूमिका घेतली होती. ते आता विरोधी पक्षनेते असले तरी ते आदिवासी महादेव कोळी समाजाचे प्रश्न सोडवतील. पिचडांनी शरद पवार व अजित पवारांवर टीका केली. त्यांनी एवढ तरी लक्षात घ्यायला हवे होते की, ते ज्या राजकीय स्थानावर आहेत ते स्थान शरद पवार यांनीच त्यांना दिले होते. पवार साहेबांवर टीका म्हणजे पिचडांचा सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.

पिचडांना इशारा

पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीका केली नाही, असे पिचडांनी सांगितले होते. यावर शिंदे म्हणाले, पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहित पाटील हे पक्षापासून दूर गेले असले तरी त्यांनी कधीही राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यावर अन्याय केला, असे म्हंटले नाही. मात्र पिचड हे जाणिव पूर्वक मराठा समाज व आदिवासी समाज या दोन समाजात गैरसमज पसरविण्याचे काम करत आहेत. मी पिचडांचा निषेध करतो. शरद पवार यांनी पद्मसिंह पाटील, मोहिते पाटील यांच्या प्रमाणेच पिचडांनाही समान वागणूक दिली होती. मात्र पिचड भाजप गेल्यावर मुलाला भाजपमध्ये पद मिळावे या आकसाने शरद पवार व अजित पवार यांच्यावर टीका करत आहेत. पिचडांत हिंमत असेल तर त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात फिरून दाखवा. आणि तिथे पवारांच्या विरोधात वक्तव्य करून दाखवा. तिथे तुमचे तोंड फोडले जाईल, असा इशारा शिंदे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT